मुंबई: सन १८९३ साली स्थापित झालेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पर्यटनस्थळांची निवड व त्यांना “अ” वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याबाबत निकष ठरविण्यात आलेल्या निकषांची पूर्तता होत असल्याने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे या स्थळास अ० वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव पर्यटन संचालनालयामार्फत सादर करण्यात आला होता.
दगडूशेठ हलवाई मंदिराला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबतचा शासन निर्णय पर्यटन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. सरकारने यासंदर्भातील प्रास्ताविकातदगडूशेठ हलवाई हे एक मंदिर नसून पुण्याच्या इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि समाजसेवेचे प्रतीक आहे. धार्मिक भक्ती, सामाजिक एकोपा, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन विकास यांचा सुंदर संगम या स्थळामध्ये दिसून येतो. त्यामुळेच हे मंदिर महाराष्ट्राच्या सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय गणेश स्थळांपैकी एक मानले जाते. हे ठिकाण पुणे शहरातील सर्वात प्रसिद्ध, श्रद्धास्थान आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे गणेश मंदिर असे ओळखले जाते. हे मंदिर महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि पर्यटन परंपरेचे प्रतीक बनले असल्याचे म्हटले आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे त्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेचा प्रभावी केंद्रबिंदू ठरले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज एकीकरण आणि राष्ट्रभक्ती जागविण्यात या गणेशोत्सवाची मोठी भूमिका होती. गणेशोत्सव काळात येथे पारंपरिक सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत, कीर्तन, भजन, समाजप्रबोधन कार्यक्रम आणि विविध धार्मिक मिरवणुका आयोजित केल्या जातात. हे मंदिर पुण्यातील प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे.
देश-विदेशातील पर्यटक पुणे भेटीदरम्यान येथे दर्शनासाठी येतात. मंदिराचे भव्य स्थापत्य, सुवर्णमंडित मूर्ती, आकर्षक प्रकाशयोजना आणि उत्सवकाळातील सजावट पर्यटकांना विशेष आकर्षित करते. हे मंदिर पुण्यातील महत्वाची ठिकाणे शनिवारवाडा, तुळशीबाग आणि पुण्यातील इतर ऐतिहासिक स्थळांच्या जवळ असल्याने धार्मिक व सांस्कृतिक पर्यटन साखळीतील महत्त्वाचा भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याआधी होता क वर्ग पर्यटनाचा दर्जा
दगडूशेठ हलवाई मंदिराला याआधी जिल्हा नियोजन समितीच्या २०२३ साली “क” वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. राज्यातील पर्यटन स्थळांची निवड व त्यांना “अ” वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याबाबत ठरविण्यात आलेल्या निकषांची पूर्तता होत असल्याने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे या स्थळास अ० वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव पर्यटन संचालनालयामार्फत ठेवण्यात आला होता त्यानुसार निर्णय घेत राज्याच्या पर्यटन विभागाने मंदिराला “अ” वर्ग पर्यटन स्थळ जाहीर केले आहे.
