अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पूर्वी, सन २०१८ मध्ये अपशब्द काढल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदम याला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप व विरोधी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकांनी आज, शुक्रवारी एकत्रितपणे महापालिका सभागृहातून बाहेर काढले.

छिंदम शिवद्रोही असल्याने, त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याने त्याला सभागृहात बसण्याचा, बोलण्याचा अधिकार नाही, त्याला यापुढे सभागृहात प्रवेश न देण्याचा ठराव करा, त्याला बाहेर काढा, अन्यथा आम्ही सभात्याग करू, असा इशारा देत छिंदम याला सदस्यांनी सभागृहातून बाहेर काढले.

या घटनेनंतर श्रीपाद छिंदम याने अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, शहर पोलीस अधीक्षक दिलीप टिपरसे यांची भेट घेत नगरसेवकांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली तसेच यामागे आमदार सूत्रधार असल्याची तोंडी तक्रार केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला लेखी तक्रार देण्याची सूचना केली.

महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा आज महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ही घटना घडली. अंदाजपत्रकावर चर्चा सुरू असताना श्रीपाद छिंदम याने महापालिकेत लेखाधिकारी, लेखापरीक्षक नसताना अंदाजपत्रक कसे तयार केले, कुणी तयार केले, ते ग्राह्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी त्याला बोलू देऊ नका, अशी मागणी करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. छिंदम याला सभागृहात बसू दिले तर आम्ही सभात्याग करू, त्याला बाहेर काढा अशी मागणी करत नगरसेवक महापौरांसमोर जमा झाले.

राष्ट्रवादीचे गणेश भोसले, संपत बारस्कर, सुरेश बनसोडे, प्रकाश भागानगरे, बाली बांगरे, अमोल येवले, विजय पठारे, विकास जगताप हे छिंदम याच्याकडे गेले व त्याला सभागृहाबाहेर काढले. यावेळी काही सदस्यांनी त्याच्या हातातील माईक हिसकावला, अंदाजपत्रकाचे पुस्तक हिसकावून घेतले. भाजप व शिंदे गटाच्या नगरसेवकांनीही राष्ट्रवादीला साथ देत छिंदमला सभागृह बाहेर जाण्यास भाग पाडले.

छिंदम सभागृह बाहेर जाण्यापूर्वी संविधानाने मला सभागृहात बसण्याचा अधिकार दिला आहे, हा दडपशाहीचा प्रकार आहे, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा आक्षेप घेतला.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, छिंदमचे पद रद्द करण्याचा ठराव करा अशी मागणी सदस्यांनी महापौरांकडे केली. आयुक्त यशवंत डांगे यांनी पुढील सभेत तसा ठराव करता येईल, असे सुचवले. त्यानंतर महापालिकेची सभा पुढे सुरळीत सुरू झाली.

काय आहे हे प्रकरण

फेब्रुवारी २०१८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या घटनेनंतर तत्कालीन महापालिका सभेत श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव करून तो राज्य सरकारला पाठवण्यात आला. राज्य सरकारने त्याचे पद रद्द केले. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग १० मधून श्रीपाद छिंदम पुन्हा अपक्ष म्हणून निवडून आला.