अहिल्यानगर:नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेंटर्मिन इंजेक्शनच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी पुन्हा कारवाई करत आज, बुधवारी दोघांना अटक केली. या दोघांकडून २० हजार ५२० रुपये किमतीच्या मेफेंटर्मीन सल्फेट इंजेक्शनच्या ५५ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
श्रीरामपूर शहरात यापूर्वीही नशेची इंजेक्शन जप्त करण्याची कारवाई यापूर्वी पोलिसांनी दोनवेळा केली. एका कारवाईत औषध दुकानदाराला ही अटक करण्यात आली. मात्र तरीही नशेच्या इंजेक्शनची विक्री व वापर थांबलेला नाही. श्रीरामपूर शहरात यापूर्वी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपये किंमतीची ‘अल्फ्राझोलम’ पावडर जप्त करण्यात आली. त्याचे धागेदोरे थेट गुजरातमधील बंदरांपर्यत पोहोचल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. ही पावडर जप्त करून अहिल्यानंतर शहरातील पोलीस मुख्यालयात सीलबंद करून ठेवण्यात आली होती. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनेच त्याची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात श्यामसुंदर गुजर या पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले. तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर शहरात नशेच्या इंजेक्शनचा वाढता वापर हा चिंतेचा विषय झाला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील थत्ते मैदान परिसरात दोन तरुण नशेच्या वापरासाठी असलेल्या मेफेंटर्मीन इंजेक्शनच्या बाटल्या विक्रीसाठी घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला. या कारवाईत अथर्व रणजीत पाटील (वय २२, रा. पटेल शाळेमागे, श्रीरामपूर) व गिरीश सुनील मुंदडा (२१, साई सहवास अपार्टमेंट, श्रीरामपूर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या झडतीत एकूण २० रुपयांच्या मेफेंटर्मीन सल्फेट इंजेक्शनच्या ५५ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
यामध्ये अथर्व पाटील यांच्याकडून टर्मिवा कंपनीच्या ५ बाटल्या (प्रत्येकी ३० मिलि.) तर गिरीश मुंदडा याच्याकडून टर्मिन कंपनीच्या ५० बाटल्या (प्रत्येकी ३० मिलि) साठा हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले. यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बाटल्या कुठून आणल्या जातात याचा शोध पोलीस घेत आहेत.
काही महिन्यांपूर्वी शिर्डीमध्ये नशेखोरांनी खून केल्याची घटनाही उघडकीस आली. शिर्डीतील नशेखोरांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे यांनी केली होती. मात्र शिर्डीमध्ये नशेच्या इंजेक्शनचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचीही तक्रार आहे.
