अहिल्यानगर: श्रीरामपूर शहरातील युवा हॉटेल व्यवसायिक आकाश शेखर दुबय्या यांच्या निघृण हत्या प्रकरणाचा तपास गतीने करावा, आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करावी तसेच खटला जलदगती न्यायालयात चालवावा, या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे केली आहे.

आकाश दुबय्या यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ व्यापारी, विवीध सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी संघटीत गुन्हेगारीच्या विरोधात शहर सलग चार दिवस बंद पाळला तसेच सर्वपक्षीयांनी मोर्चाही काढला होता.

आमदार ओगले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, दुबय्या कुटूंबास न्याय मिळणे व समाजात कायद्याबाबत विश्वास निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. प्राथमिक माहितीनुसार या गुन्ह्यातील आरोपी हे संघटीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्याशी संबंधीत टोळीची श्रीरामपूर शहरात दहशत असल्याची भावना नागरिकांमध्ये असून या प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व संबंधीत आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करावी तसेच या संवेदनशिल व गंभीर प्रकरणाचा खटला प्रलंबीत न राहता जलदगतीने निकाली निघावा यासाठी फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याची गरज आहे.

शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी व प्रकरणाचा सक्षम पाठपुरावा करण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून खासदार ॲड. उज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणामुळे श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांमध्ये सुरक्षीततेची भावना निर्माण करण्यासाठी तसेच दुबैय्या कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मागण्यांचा सहाणुभुतीपूर्वक व गांभीर्याने विचार करून तात्काळ आवश्यक ते निर्देश द्यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे.