अहिल्यानगर:श्रीरामपरमधील हॉटेलमालक आकाश दुबय्या यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसेच शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे त्रस्त असलेले नागरिक, व्यापारी व राजकीय नेत्यांनी दिलेल्या श्रीरामपूर बंदच्या हाकेला आज, रविवारी शंभर टक्के प्रतिसाद मिळला. संतप्त श्रीरामपूरकरांनी शहर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आकाशचे पार्थिव पोलीस ठाण्यात आणत आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाईसाठी अंत्याविधी न करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी जिल्हा पोलिस प्रमुख मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आज सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी स्वतःहून कडकडीत बंद पाळला. आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, प्रकाश चित्ते, दिलीप नागरे, दिपक वमने आदींनी फेरी काढुन गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी साथ द्या, असे आवाहन केले.
भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे श्रीरामपूरमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील व्यापारी संघटनेने तातडीची बैठक घेत बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली व गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा, या मागणीसाठी महात्मा गांधी चौकात व नंतर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या देत पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोक्का अंतर्गत कारवाईचे आश्वासन पोलिस अधिक्षक श्रीरामपूरला येऊन देत नाही तोपर्यंत आकाशचा मृतदेह पोलिस ठाण्यासमोरून न उचलण्याची भूमिका घेतली.
माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, अंजूम शेख, जितेंद्र छाजेड, रवी पाटील, राजेंद्र सोनवणे, राजेंद्र देवकर, अशोक थोरे, बाबा शिंदे, संजय छल्लारे, सचिन गुजर, सचिन बडधे, ज्ञानेश्वर मुरकुटे, वैशाली चव्हाण, केतन खोरे, लखन भगत, श्रीराम दुबय्या, कैलास दुबय्या, कुणाल दुबय्या, आदी आंदोलनात सहभागी होते.
सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी नागरिकांना आश्वस्त करत शहरातील सर्व गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपअधिक्षक जयदत्त भवर, स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष मुटकुळे, निरीक्षक विशाल खैरे आदी उपस्थित होते. दरम्यान, जोपर्यंत प्रमुख गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत बंद सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी जाहीर केले.
बंद कायम
श्रीरामपूरचे युवा उद्योजक आकाश दुबया यांच्या खुनाबाबत पोलिसांनी आरोपींवर संघटित गुन्हेगारीअंतर्गत कारवाईचे आश्वासन दिले असले तरी जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही तोपर्यंत श्रीरामपूर शहर बंद राहणार असे आवाहन सर्वपक्षीय, विविध संघटनांनी केले आहे.
गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनाच्या पोलिसांना सूचना- विखे
श्रीरामपूरची ओळख गुन्हेगारी शहर म्हणून होत चालली असून पोलिसांनी कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती. आपण पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटनाच्या सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आकाश दुबैया यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, श्रीरामपूरात अवैध धंदे, गुंडांच्या टोळ्या कार्यरत आहेत. गोरगरीबांवर अन्याय, महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असल्याची माहिती मिळाली आहे. एका महिन्यात सर्व गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी स्वतः पोलिस अधिक्षकांनी लक्ष घातले आहे. वाळूमुळे अनेक गुन्हेगारी टोळ्या तयार होत आहेत. आपण शासनदरबारी हा विषय प्राधान्याने मांडू. सध्या ऑनलाइन नशेची इंजेक्शन आणि पदार्थ मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातले असून त्याचाही बंदोबस्ताची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
