अहिल्यानगर श्रीरामपूर शहरातील घरमालक, गाळेधारक, व्यापारी तसेच व्यावसायिक आस्थापनांवर घरपट्टी, नळपट्टी आणि दुकानांवरील करामध्ये दुप्पट ते पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ आज, रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. रिपब्लिकन पक्षाने पुकारलेल्या या बंदला श्रीरामपूरमधील व्यापारी, व्यावसायिक आणि विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याने बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
श्रीरामपूर नगरपरिषदेच्या वाढीव कर आकारणीमुळे घरमालक, लहान-मोठे व्यापारी आणि गाळेधारक आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नगरपरिषदेने नागरिकांशी चर्चा न करताच अन्यायकारक पद्धतीने करामध्ये मोठी वाढ केली असून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
शहरातील प्रमुख मार्गांवरून आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती फेरी काढून करण्यात आली. त्यानंतर गांधी पुतळा परिसरात करवाढीच्या विरोधात ‘अन्यायकारक करवाढ रद्द करा’, ‘श्रीरामपूरकरांवरील आर्थिक जुलूम बंद करा’, ‘वाढीव करपट्टी मागे घ्या’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. नगरपरिषदेने वाढविलेल्या करपट्टीच्या प्रतींची होळी केली. आंदोलकांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत, करवाढीचा निर्णय त्वरित रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
या आंदोलनात व्यापारी संघटनेचे संचालक गौतम उपाध्ये, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संतोष डहाळे, शहराध्यक्ष उमेश पवार, राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड, माजी नगरसेवक मुक्तार शहा, मोहम्मद पोपटिया, बाळासाहेब चांडवले, सतीश कुंकूलोळ, रमीज पोपटिया यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी सहभागी झाले होते.
फेरी दरम्यान व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. बहुतांश बाजारपेठा होत्या. आंदोलनाच्या शेवटी सुभाष त्रिभुवन यांनी श्रीरामपूर शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिक, नागरिक तसेच विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, नागरिकांवर अन्याय करणारी ही करवाढ तातडीने मागे घेतली नाही तर आगामी काळात यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल.
