अहिल्यानगर: श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी नागरिक व सर्वपक्षीयांनी दाखवलेली एकी कायम ठेवून गुन्हेगारी टोळीला ‘मकोका’ अन्वये कारवाई होईपर्यंत विविध मार्गाने आंदोलन सुरूच ठेवावे लागेल असे निर्धार करत ‘श्रीरामपूर बंद’ आंदोलन आज, बुधवारी मागे घेण्यात आले. आमदार हेमंत ओगले यांनी आजच्या मोर्चाप्रसंगी जाहीर केले. दरम्यान आजही श्रीरामपूर शहरात बंद पाळण्यात आला.

श्रीरामपूरातील वाढती गुन्हेगारी व तरुण हॉटेल व्यवसायिक आकाश दुबय्या यांच्या हत्येच्या निषेधार्थ गेल्या चार दिवसांपासून श्रीरामपूर शहरात बंद पाळला जात आहे. आज खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना फाशी व्हावी, गुन्हेगारी टोळी हद्दपार करावी या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी विराट मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चात विविध व्यावसायिकांच्या संघटना, शाळा, महाविद्यालय, पेट्रोल पंप सहभागी झाले होते. सर्वांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात होता.

यावेळी आमदार ओगले म्हणाले, श्रीरामपूरातील गुन्हेगारी टोळीने गरिबांना लुटणे, व्यापारी, डॉक्टरांकडून खंडणी मागण्याचे प्रकार केली. या टोळीने अन्याय अत्याचार, शोषण केले. मात्र अनेकदा पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही. ही टोळी पूर्णपणे हद्दपार करा व ‘मकोका’अन्वये कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. व्यापारी, व्यावसायिकांचे नुकसान नको म्हणून बंद मागे घेतला जात आहे. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून गुन्हेगारी विरोधात आंदोलन सुरूच राहील. सर्वजण एकत्र आले तर काय होते हे श्रीरामपूरकरांनी दाखवून दिले व यापुढेही दाखवून देतील.

श्रीरामपुरातील टोळीचा मटका, जुगार, बिंगो, वाळू तस्करी, नशेचे इंजेक्शन अशा अनेक अवैध धंद्याशी संबंध आहे. दहशतीमुळे सामान्य माणूस फिर्याद देत नाही. त्यामुळे पोलिसांनीच स्वतःहून टोळीचा बिमोड केला पाहिजे, अशी मागणी प्रकाश चित्ते त्यांनी केली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पठारे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गुंडगिरी मोडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सक्त सूचना केल्याने पोलीसही आता सक्रिय झाले असले तरी सर्वांना एकजुटीने मुकाबला करावाच लागेल, असे आवाहन केले.

माजी आमदार लहू कानडे, भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, अशोक थोरे, रमादेवी धीवर, सुनील मुथा यांची भाषणे झाली. दुबय्या कुटुंबातील शेखर दुबय्या, कैलास दुबय्या, श्रीराम दुबय्या यांच्यासह माजी आमदार भानुदास मुरकुटे, नगराध्यक्ष करण ससाने, संजय फंड, श्रीनिवास बिहानी, जितेंद्र छाजेड, ज्ञानेश्वर मुरकुटे, दिलीप नागरे, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण, वंदना मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, पूजा चव्हाण, पुष्पलता हरदास, अशोक उपाध्ये मोर्चात सहभागी होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त तैनात होता. मोर्चा शांततेत पार पडला.

चार पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील चार पोलिसांचे गुन्हेगारी व अवैध धंदे चालकांशी संबंध असल्याने त्यांना तातडीने बडतर्फ करा, अशी मागणी आमदार ओगले यांनी केली. ओगले यांनी यावेळी चार पोलिसांची नावेही सभेत जाहीर केली.

गुन्हेगारांना पक्षातून हकला

खून झालेल्या आकाश दुबय्याचे वडील माजी नगरसेवक शेखर दुबय्या यांनी श्रीरामपूरकरांचे आभार मानत, असे प्रकार घडू नये यासाठी एकत्रित लढा देण्याचे आवाहन केले. गुन्हेगारी लोकांना पक्षातून काढून टाकावे असेही आवाहन त्यांनी माजी आमदार मुरकुटे व भाऊसाहेब कांबळे यांना केले. गुन्हेगारांना पक्षातून काढा, त्यांचा एन्काऊंटर करा अशीही मागणी त्यांनी केली.