अहिल्यानगर: वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध तसेच हॉटेल व्यवसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहरात सलग तिसऱ्या दिवशी आज, मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. उद्या, बुधवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला जाणार आहे. दरम्यान नागरिकांच्या या दबावानंतर पोलीस सक्रिय झाले असून पोलिसांच्या पथकाने संघटित गुन्हेगारी चालवणाऱ्या सोनू बेग याच्या सदनिकेवर छापा टाकून एक रिव्हॉल्व्हर, २ काडतुसे, कागदपत्रे, कोरे धनादेश, एटीएम कार्ड जप्त केले.

श्रीरामपूरच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे तिसऱ्या दिवशी बंद पाळला. त्यातून श्रीरामपूरकरांच्या मनात गुन्हेगारीविरोधात असणारा तीव्र संताप व्यक्त होत आहे. सर्व व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. दरम्यान उद्या खून प्रकरणातील आरोपींना विरुद्ध ‘मकोका’ अंतर्गत कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्यात येणार आहे.

मारहाण प्रकरणात अटकेत असलेला सोनू बेग संघटित गुन्हेगारी चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सोनू बेगच्या सरस्वती वसाहतीमधील सदनिकेवर काल, सोमवारी रात्री छापा टाकला. या छाप्यात एक रिव्हॉल्व्हर, दोन काडतुसे, एका महिलेची स्त्री रोग तज्ज्ञाकडील फाईल, यासह कोरे धनादेश, एटीएम कार्ड असे साहित्य आढळल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.

काही जणांनी अवैध अग्नीशास्त्राचा वापर करून दोन मुलींना डांबल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. सदनिकेच्या तपासणीमध्ये वरील साहित्य आढळून आले. सोनू बेग हा संघटित गुन्हेगारी चालवत असून या टोळीच्या माध्यमातून बेकायदेशीर धंदे करून त्यामधून अवैध आर्थिक लाभ मिळवत असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वाकचौरे यांनी सांगितले.

यासंदर्भात पोलिस अंमलदार छांचा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सोनू बेग याच्यासह एक महिला व त्याचा नातलग अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रिव्हॉल्व्हर कोणाकडून विकत घेतले, ते कोणाला विकले जाणार होते, कोणत्या उद्देशाने आणले, याचा तपास केला जात असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले.

बेलापूरमध्येही बंद

दरम्यान हॉटेल व्यवसायिक अशोक दुबय्या हत्याप्रकरणी आरोपींना शासन करावे, बेलापूर गावची शांतता कायम राहावी, यासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या बेलापूर बंदला आज उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यवसायिकांनी उस्फूर्तपणे आपले व्यवसाय बंद ठेवले होते. बेलापूर व्यापारी संघटना, बेलापूर किराणा व्यापारी संघटना, पीठ गिरणी संघटना, नाभिक संघटना यांनी बंदला पाठिंबा दिला होता.

पोलीस कर्मचारी शंकर चौधरी निलंबित

श्रीरामपूरातील सराईत गुन्हेगाराशी संबंध असल्याचा आरोप असलेला पोलीस अंमलदार शंकर चौधरी याला जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निलंबित केले आहे. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शंकर चौधरी हा सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. यापूर्वी त्याची नेमणूक श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात होती. मात्र, त्याच्याविरुद्ध गुटखा तस्करीशी संबंधित कथित आरोपांनंतर तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी त्याची बदली पोलीस मुख्यालयात केली होती.

त्यानंतरही त्याच्या विरोधातील तक्रारी कायम राहिल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली. श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या आंदोलनात स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. पोलीस शंकर चौधरी याच्याविरोधातील एक चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झालेली आहे.