अहिल्यानगर: दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे श्रीरामपूर शहराच्या पाणीपुरवठ्याचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. सध्या दररोज पाणीपुरवठा होत असला तरी आगामी काळात १ किंवा २ दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल. परिस्थिती गंभीर झाल्यास ४ ते ५ दिवसात पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने पाणीबचत व पर्यायी व्यवस्थेचे नियोजन सुरू केले आहे. नळाच्या पाण्याने वाहने किंवा रस्ते धुणे व टाक्या भरून पाणी वाहून जावू देणे, अपव्यय करणे, यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय श्रीरामपूर नगरपालिकेने घेतला आहे.
श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने, मुख्याधिकारी मनोज उकिरडे व पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. नळाच्या पाण्याने वाहने किंवा रस्ते धुतल्यास तसेच टाक्या भरून पाणी वाहून जात असल्यास पहिल्यावेळी १५० रुपये, दुसऱ्या वेळी ३०० रुपये तर वारंवार उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास नळजोडणी खंडित करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. जलवाहिन्यांची गळती आढळल्यास नागरिकांनी ९३७१७१७९९१ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष पथके तैनात केली जाणार आहेत.
पाणीटंचाईचा परिणाम दैनंदिन जीवनावर होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन व वेळेत पर्यायी व्यवस्था उभी करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी पाणीबचत व पाणी जपून वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.
सध्या भंडारदरा धरणातून शेती व पिण्याच्या पाण्याच्या आवर्तन सुरू आहे. मात्र आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचे आवर्तनाचे वेळापत्रक मिळाल्यानंतर पुरवठ्याचे नियोजन करणे सोपे होईल, असे ससाने यांनी सांगितले. वाढत्या उष्णतेमुळे भंडारदरा धरणातील सुमारे पाऊण टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाल्याची माहिती त्यांनी दिली.
सुमारे १७३ कोटी रुपये खर्चाच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेतील साठवण तलावाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा तलाव पूर्ण झाल्यास सुमारे ६० दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
६८ विंधनविहिरींवर स्वयंचलित टायमर
शहरात वापरात असलेल्या ६८ विंधनविहिरींवर स्वयंचलित टायमर बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे पंपांचा अनावश्यक वापर व पाण्याचा अपव्य रोखण्यास मदत होणार आहे. तसेच टँकर भरण्यासाठी शहरातील १० ठिकाणी विहिरी व विंधनविहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज भासल्यास खाजगी जलस्रोत अधिकग्रहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगितले.
