अहिल्यानगर: श्रीरामपूर शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा धरणातून १५ डिसेंबरला सोडण्यात येणारे आवर्तन आता १ डिसेंबरलाच सोडण्यास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यता दिली. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे श्रीरामपूरकरांना दिलासा मिळाला असून, शहरास आता सोमवार आणि गुरुवार असे आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा केला जाणार आहे. टंचाईमुळे नगरपालिकेने यापूर्वी आठवड्यातून एकच दिवस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी माहिती दिली. यावेळी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मुजफ्फर शेख, आशिष धनवटे, दिलीप नागरे, योगेश जाधव, दीपक वमने, श्याम अडांगळे, लकी सेठी, वैशाली चव्हाण आदी उपस्थित होते.

आमदार ओगले यांनी सांगितले की, शहरातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन पालकमंत्री विखे यांची भेट घेतली. त्यानंतर आवर्तनाची तारीख १५ दिवसांनी अलिकडे आणण्याचा निर्णय झाला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराशी चर्चा करून काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ९० कोटी लिटर क्षमतेच्या संतुलन जलकुंभाचे काम १५ फेब्रुवारीपर्यंत, तर संपूर्ण योजना ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

तातडीच्या उपाययोजनांमध्ये मोठ्या वस्त्या व झोपडपट्टी भागांत ५ हजार लिटरच्या २५ टाक्या बसविण्यात येत आहेत. बंद बोअरवेल दुरुस्तीसाठी चार पथके कार्यरत असून, ५ नोव्हेंबरपर्यंत दुरुस्तीचे उद्दिष्ट आहे. पालिकेव्यतिरिक्त आणखी १५ टँकर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. आमदार निधीतून १५ लाख रुपये पाणीटंचाईवरील उपाययोजनांसाठी दिले जाणार असल्याचे ओगले यांनी सांगितले.

शहराच्या साठवण तलावासह दिघी, शिरसगाव आणि बेलापूरचे साठवण तलाव भरून घेण्याचे नियोजन आहे. भविष्यातील वाढणारी एमआयडीसी, शहर यांची पाण्याची गरज लक्षात घेवून स्व. जयंत ससाणे यांच्या कार्यकाळात भंडारदरा धरणातील पाण्याबरोबरच मुळा धरणातूनही पाणी उपलब्ध करून घेण्याचा प्रस्ताव होता. मुख्यमंत्र्यांनीही या प्रस्तावावर अनुकूल शिफारस केल्याचे ओगले यांनी सांगितले.

नगराध्यक्ष करण ससाणे यांनी आठ दिवसांनी पाणीपुरवठ्याच्या नियोजनामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सध्या पालिकेचे पाच टँकर सुरू असून, स्व. जयंत ससाने मित्र मंडळाच्या वतीने आणखी पाच टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. आगामी काळात आवर्तनांमधील खंड लक्षात घेता नागरिकांनी पाण्याची काटकसरीने वापर करून साठवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले.