श्रीवर्धन: काळ आला होता पण वेळ नाही असे म्हणतात याची प्रचिती श्रीवर्धन करांना गुरुवारी आली. शहरातील दोन गल्ली परिसरात दरड कोसळली. पण सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. त्यामुळे मोठे संकट टाळले.रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यात यापूर्वीही दरड दुर्घटना घडल्या आहेत ज्यात शेकडो लोकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे भूस्खलनाचा सर्वाधिक धोका असलेला परिसर म्हणून रायगड जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यात दरड प्रवण गावांची संख्या सातत्याने वाढत गेली आहे.
खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे दरड कोसळून 84 जणांचा मृत्यू झाला होता. महाड तालुक्यातील तळी येथे दरड कोसळून 84 जण मृत्युमुखी पडले होते. 2005 मध्ये महाड मधील जुई, दासगाव , कोंडिवते, पोलादपूर तालुक्यातील कोंढवी, कोतवाल गावांमध्ये दरडी कोसळल्या होत्या. ज्यात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. दरड दुर्घटनांमधील जीवितहानीचे प्रमाण प्रचंड असल्याने या घटनांबाबत लोकांच्या मनात प्रचंड धास्ती असते. त्यामुळे दरड प्रमाणे गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अतिवृष्टीच्या काळात सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले जाते.
अशीच एक दरड दुर्घटना श्रीवर्धन शहरातील धोंडगल्ली परिसरात घडली. दोन ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली.एका तीव्र उताराच्या पायवाटेवरून एक भला मोठा दगड वेगाने खाली आला आणि घराच्या बाजूलाच उभ्या केलेल्या दुचाकीवर आदळला. सुदैवाने, दुचाकीवर धडकल्यानंतर दगड तिथेच थांबल्याने एक मोठी दुर्घटना टळली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जर हा दगड मुख्य रहदारीच्या रस्त्यावर आला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती. या घटनेत दुचाकीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, या पायवाटेच्या मार्गावर अनेक घरे असून दरड कोसळण्याचा धोका नेहमीच असतो.तरीही श्रीवर्धन नगरपरिषदेने या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही आवश्यक उपाययोजना केलेल्या नाहीत, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने येथे तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
या परिसरात डोंगरावरील सैल झालेले दगड तातडीने हटवावेत. वस्ती असलेल्या परिसरात दरड संरक्षक भिंतींची उभारणी करण्यात यावी अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली.
