Shubham Khairnar NEET Paper Leak investigation: वैद्यकीय शिक्षण पूर्ण न करता स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या नाशिकमधील शुभम खैरनारला नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाली. मध्य नाशिकच्या एका व्यावसायिक संकुलात खैरनारने स्वतःचे कार्यालय थाटले होते. या भागातून दररोज वैद्यकीय शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी ये-जा करत असतात. कुणी पुस्तके घेण्यासाठी, शिकवणी घेण्यासाठी आणि नीटची तयारी करणाऱ्या अनेकांची इथे वर्दळ असते. याच भागात कार्यालय उघडून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणाऱ्या खैरनारने पेपरफुटी प्रकरणात लाखो रुपये कमवल्याचा आरोप होत आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण न करता कथित डॉ. शुभम खैरनारने लाखो रुपयांची माया कशी जमवली? हे जाणून घेऊ.

शुभम खैरनारने २०२१ साली भोपाळमधील सेहोर येथील श्री सत्य साई विद्यापीठात बॅचलर ऑफ आयुर्वेद, मेडिसिन अँड सर्जरीसाठी (BAMS) प्रवेश घेतला होता. द इंडियन एक्सप्रेसने या विद्यापीठाचे कुलगुरू मुकेश तिवारी यांच्याशी संवाद साधत खैरनारची माहिती घेतली. यावेळी तिवारी यांनी म्हटले की, खैरनारने विद्यापीठात प्रवेश घेतला होता. मात्र त्यानंतर तो पुन्हा कधीही आला नाही. वर्गात आणि परीक्षांसाठी तो अनुपस्थित राहिला.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण न करता शुभम खैरनार नाशिकमध्ये परतला. त्याने स्वतःच्या नावापुढे ‘डॉ’ लावले आणि त्याने एसआर एज्युकेशन कन्सल्टन्सी उघडली. ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस आणि इतर वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम या कन्सलटन्सीद्वारे केले जात होते. अनेक विद्यार्थी त्याच्याकडे येत असत, असे सांगितले जाते. नाशिकच्या नीट समुपदेशन वर्तुळात शुभमने स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्याला प्रवेश प्रक्रिया समजते, तो प्रवेश मिळवून देण्यात सहकार्य करू शकतो, असा समज खैरनारबद्दल निर्माण झाला होता.

नीट-यूजी परीक्षेच्या पेपर फुटीशी नाशिकचे संबंध असल्याची बाब मंगळवारी समोर आली.

Shubham Khairnar’s office in Nashik
नाशिक शहरातील शुभम खैरनार याच्या कन्सल्टन्सीचे कार्यालय (Express Photo)

१० लाखात प्रश्नपत्रिका घेऊन १५ लाखात विकली

२७ वर्षीय शुभम खैरनारने नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका १० लाख रुपयांत विकत घेऊन ती १५ लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. कुरिअरद्वारे नाशिकपासून ते राजस्थानपर्यंत प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात आले. राजस्थानमधील सीबीआय पथकाने नाशिक पोलिसांना खैरनारच्या सहभागाची माहिती दिल्यानंतर त्याची अटक करण्यात आली.

केस भादरून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

पोलीस आपल्या मागावर असल्याचा संशय आल्यानंतर खैरनारने डोक्यावरचे केस भादरले. आपली ओळख पटणार नाही, याचा प्रयत्न त्याने केला. मात्र नाशिकमधील एका मंदिराबाहेरून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी जेव्हा त्याला पकडले, तेव्हा ‘मी शुभम नाही’, असे सांगून त्याने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण तपासकर्त्यांनी त्याच्या जुन्या फोटोच्या सहाय्याने ओळख पटवली. तांत्रिक पुरावे आणि स्थानिकांच्या माहितीनंतर हाच शुभम खैरनार असल्याची खात्री झाली.

शुभमचा माग काढणे सोपे नव्हते, असे तपासकर्ते सांगतात. शुभम खैरनार एवढेच नाव तपासकर्त्यांच्या समोर होते. परंतु हे आडनाव नाशिक जिल्हा आणि शहरात सामान्य असल्याचे लक्षात आल्यानंतर तपास पथकासमोर सुरुवातीला अडचणी आल्या. पोलिसांनी तांत्रिक पाळत आणि डिजिटल ट्रॅकिंगचा वापर केला. तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचे छायाचित्र मिळवले आणि एका सोशल मीडिया प्रोफाइलद्वारे तो अजूनही सक्रियपणे वावरत असल्याचे लक्षात आले. याच प्रोफाइलद्वारे पोलिसांनी त्याच्या हालचालींचा मागोवा घेतला.

neet paper leak protest
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियातर्फे नवी दिल्लीत मंगळवारी निदर्शने करण्यात आली.

पोलीस जेव्हा शुभम खैरनारपर्यंत पोहोचले तेव्हा त्याने डोक्यावरचे केस काढून टाकलेले होते. पोलिसांनी जुन्या छायाचित्राच्या आधारावर त्याला ताब्यात घेतले.

वडीलही अधिकृत शिक्षणाशिवाय वैद्यकीय व्यवसायात

खैरनार मुळचा नाशिकच्या नांदगावमधील रहिवासी. त्याचे वडील मधुकर खैरनार हे गावात डॉक्टर म्हणून ओळखले जातात. ग्रामस्थ म्हणाले की, ते आयुर्वेदिक पद्धतीने रुग्णांवर उपचार करतात. द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना, मधुकर यांनी मात्र स्वतःला शेतकरी म्हटले. आपण वैद्यकीय शिक्षण घेतले नसल्याचेही ते म्हणाले. मात्र ते रुग्णावर उपचार करतात, हे त्यांनी मान्य केले. आपला मुलगा काय करत होता, याबाबत कल्पना नसल्याचेही ते म्हणाले. मधुकर म्हणाले, “शुभम प्रॅक्टिस करत असून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करतो, इतकीच माहिती मला होती.”

शुभमचा लहान भाऊ भावेश खैरनार हाही याच व्यवसायाशी निगडित आहे. नांदगावमध्ये त्याची फार्मसी आणि प्रयोगशाळा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भावेशकडे गावठी पिस्तूल आढळून आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. नांदगाव पोलीस ठाण्यात भावेश आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. भावेश सध्या जामिनावर बाहेर आहे.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात-आठ महिन्यांपासून शुभम नाशिक शहरात एका भाड्याच्या खोलीत राहत होता. कन्सल्टन्सीच्या माध्यमातून तो नीट समुपदेशन वर्तुळात सक्रिय होता. तपास अधिकारी आता त्याच्या नेटवर्कची संपूर्ण व्याप्ती आणि पेपर फुटी प्रकरणामधील त्याच्या भूमिकेची तपासणी करत आहेत.

देशभरातून ८, तर राज्यातून ४ जण ताब्यात

नीट-यूजी पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने बुधवारी देशभरात कारवाई केली. आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात जयपूरमधून तिघे, पुण्यातून दोघे, तर गुरुग्राम, नाशिक, अहिल्यानगरमधून प्रत्येकी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये जयपूरमधून मांगिलाल बिवल, विकास बिवल आणि दिनेश बिवल असे तिघे, गुरुग्राममधून यश यादव, नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे, पुण्यामधून ब्युटीपार्लर चालक मनीषा वाघमारे व शेषराव सोळंकी या अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्याचा समावेश आहे. मांगिलाल व दिनेश हे दोघे बंधू जयपूर शहरानजीक बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत. सिकर येथील विद्याथ्र्याला विकण्यासाठी त्यांनी नीटचा पेपर विकत घेतल्याचा संशय आहे. या अटकेनंतर राजस्थानमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. दिनेश बिवल हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी केला. भाजपने हा आरोप फेटाळून लावला.