अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या पोस्टमुळे किंवा रिल्समुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने तुकाराम मुंढेंना उद्देशून एक पोस्ट केली होती, ज्यामुळे श्वेता तिवारी चर्चेत आली होती. तसंच तिने एक सोशल मीडिया पोस्ट करत श्वेताने मनसेवर आरोप केले होते. श्वेता तिवारी म्हणाली होती की महिलांविरोधात टिप्पणी आणि ट्रोल करणाऱ्यांमध्ये मनसे पक्षातले समर्थकही आहेत. यानंतर मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत श्वेता तिवारीला खणखणीत उत्तरही दिलं होतं. आता याच श्वेता तिवारीने राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. नेमकं काय प्रकरण आहे आपण जाणून घेऊ.

श्वेता तिवारीने केली इन्स्टाग्राम पोस्ट आणि मांडली भूमिका

श्वेता तिवारीने तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “काही दिवसांपूर्वी मी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात काही लोक विनाकरण महिलांवर अपमानास्पद टिप्पणी करत होते. तेव्हा मी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्सचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते. कारण मला असं वाटतं की, असे वर्तन करणाऱ्यांना आपण यातून सहज सुटू शकतो, असं त्यांना वाटता कामा नये. मी राज ठाकरेंसमोर प्रश्न उपस्थित केला होता की, मनसेचे समर्थक असल्याचा दावा करणाऱ्यांचं वर्तन त्यांना मान्य आहे का?”, असं श्वेता तिवारी म्हणाली होती. ‘काही वेळानंतर मनसे पक्षातील नेत्या स्नेहल अडारकर यांनी माझ्याशी संपर्क साधला. तसेच महिलांप्रति असा वर्तन मुळीच खपवून घेतलं जाणार नाही असं मला सांगितलं.

मनसेच्या स्नेहल अडारकर यांचे मी मनापासून आभार मानते-श्वेता

“स्नेहल यांनी असंही स्पष्ट केलं की, या प्रकरणात सहभागी असलेले लोक पार्टीतील सदस्य नव्हते. गुन्हा कुणी केला आहे, याचा नक्कीच शोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी त्यांनी काही दिवसांसाठी माझ्याकडे मुदतही मागितली. अवघ्या तीन दिवसांतच, स्नेहल यांनी त्या व्यक्तींचा फोन नंबर आणि हाताने लिहिलेले माफीपत्र पाठवले’, अशी माहिती श्वेता तिवारीने तिच्या पोस्टमधून दिली. ‘त्यांनी यावेळी माझ्यासमोर स्पष्ट केलं की, महिलांचा अपमान आम्ही आणि आमचा पक्ष कधीही सहन करत नाही. तसेच स्नेहल यांनी सांगितले की, भविष्यात मला कधीही अशा प्रकारच्या समस्या आल्या, तर, मी स्नेहल यांच्याशी संपर्क साधू शकते. त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले, हे खरंच कौतुकास्पद आहेत.” असं श्वेताने तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Shweta Tiwari Thanks Raj Thackeray
श्वेता तिवारीने इन्स्टा पोस्ट करत राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. (फोटो-श्वेता तिवारी इन्स्टाग्राम)

श्वेता तिवारी राज ठाकरेंना म्हणाली थँक्यू

श्वेता तिवारीने यावेळेस त्या व्यक्तींकडून पाठवण्यात आलेला माफीनामा देखील शेअर केला. श्वेताने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, “खरंतर ही समस्या कोणत्याही एका व्यक्ती किंवा घटनेपेक्षाही मोठी आहे. ती केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही. मला खरंच आशा आहे की, जगातील तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स नक्कीच यावर तोडगा काढतील. कारण सध्या ऑनलाइन गैरवर्तन हे नियंत्रणाबाहेर चाललं आहे. तरी देखील त्यांच्या प्रयत्नांचे मी विशेष कौतुक करते. या प्रकरणाला गांभीर्याने घेतल्याबद्दल राज ठाकरे जी, थँक्यू” असं म्हणत श्वेताने राज ठाकरेंचे आभार मानले आहेत.