अखिल भारत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे. “महाराजांनी दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं ३० लाख रुपयांच्या बक्षिसाचं आव्हान दरबारात नाही, तर नागपुरात पत्रकार आणि पंचसमितीच्या समक्ष स्वीकारावं,” असं आव्हान दिलं. तसेच धीरेंद्र महाराजांनी त्यांचे दावे सिद्ध केले, तर मी धीरेंद्र महाराजांच्या पायावर डोकं ठेवेन आणि माफी मागेन, असं जाहीर केलं. ते शनिवारी (२१ जानेवारी) एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्याम मानव म्हणाले, “धीरेंद्र महाराजांच्या दाव्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रितसर वैज्ञानिक कसोट्यांवर आव्हान दिलं आहे. आम्ही पत्रकार परिषद घेऊन लिखित स्वरुपात हे आव्हान दिलं आहे. या आव्हानाच्या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण हे दावे करताना माहिती गोळा करण्याची यंत्रणा वापरली जाते. तशाप्रकारे आम्ही अनेक बाबांच्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे.”

“आव्हान प्रक्रिया महाराजांच्या दरबारात पार पडणार नाही”

“कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून दाव्या करणाऱ्यांपर्यंत माहिती पोहचू नये याची काळजी घेऊन ही आव्हान प्रक्रिया वैज्ञानिक कसोट्यांवर आयोजित करावी लागते. त्यासाठी आम्ही स्पष्टपणे म्हटलं की, ही आव्हान प्रक्रिया महाराजांच्या दरबारात पार पडणार नाही. ही प्रक्रिया नागपूरमधील सर्व पत्रकारांसमोर होईल. त्यासाठी एक तटस्थ पंचसमिती नेमली जाईल,” असं श्याम मानव यांनी सांगितलं.

हेही वाचा : धीरेंद्र महाराज-अंनिस वादात आता राम कदमांची उडी; म्हणाले, “स्वत:ला अंधश्रद्धा निर्मुलनकार म्हणवून घेणारे…”

“१० माणसांना पाहून महाराजांनी नाव, वय, वडिलांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर सांगावा”

श्याम मानव पुढे म्हणाले, “महाराजांचा दरबार आयोजित करणारे संयोजक आणि आम्ही एकत्र बसून नागपुरातील अशा पाच लोकांना निवडू जे त्यांचेही नाहीत आणि आमचेही नाहीत, तटस्थ आहेत. यात निवृत्त न्यायाधीशांचाही समावेश असू शकेल. त्या पंचसमितीसमोर ही आव्हान प्रक्रिया दोनदा पार पडेल. पहिल्यांदा आम्ही त्यांच्या पुढे अचानक १० माणसं उपस्थित करू. त्या माणसांना पाहून या महाराजांनी नाव, वय, वडिलांचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर सांगायचा आहे.”

“…पण दिव्यशक्ती १०० टक्के खरी ठरते”

“माणसांची ओळख सुरू असेल त्याच्याच बाजूच्या रुममध्ये आम्ही १० वस्तू ठेऊ. त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग होत राहील. महाराजांनी त्या १० वस्तू ओळखायच्या आहेत. ही प्रक्रिया दोनदा पार पाडली जाईल. माणसाच्या हातून चुका होऊ शकतात, पण दिव्यशक्ती १०० टक्के खरी ठरते. त्यामुळे दिव्यशक्तीच्या हातून चुका होण्याचं काही कारण नाही,” असं श्याम मानव यांनी म्हटलं.

हेही वाचा : धीरेंद्र कृष्ण महाराजांची कमाई आयटी कंपनीतल्या अधिकाऱ्यापेक्षा जास्त! एक कथा सांगण्यासाठी घेतात ‘इतके’ रुपये

“…तर महाराजांना ३० लाख रुपयांचं बक्षीस देऊ”

“असं असलं तरी धीरेंद्र महाराज दोन्ही वेळा ९० टक्के माहिती बरोबर सांगू शकले तर याचा अर्थ असा होतो की त्यांच्यात दिव्यशक्ती आहे. त्यांना दिव्यशक्ती प्रसन्न आहे. त्यानंतर आम्ही त्यांना आमच्या समितीचं ३० लाख रुपयांचं बक्षीस देऊ. गेल्या ४० वर्षांपासून आम्ही हे पारितोषिक जाहीर करतो आहे. आधी हे बक्षीस एक लाखाचं होतं, आता ते ३० लाख रुपयांचं झालं,” असं मानव यांनी नमूद केलं.

“आव्हान नागपूरमध्ये पत्रकार आणि पंचसमितीसमोरच पार पडेल”

श्याम मानव म्हणाले, “महाराजांकडे कोट्यावधी रुपये आहेत. त्यामुळे महाराजांना बक्षीस नको असेल तर त्यांना ३ लाख रुपये भरावे लागणार नाहीत. ते थेट हे आव्हान स्वीकारू शकतात. हे आव्हान नागपूरमध्ये पत्रकार आणि पंचसमितीसमोरच पार पाडलं जाईल.”

हेही वाचा : धीरेंद्र कृष्ण महाराजांनी ३० लाखांचं आव्हान स्वीकारल्यानंतर श्याम मानव यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“…तर महाराजांच्या पायावर डोकं ठेवेन आणि माफी मागेन”

“धीरेंद्र महाराज दोनदा ९० टक्के माहिती बरोबर सांगू शकले, तर मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा संस्थापक श्याम मानव धीरेंद्र महाराजांच्या पायावर डोकं ठेवेन आणि माफी मागेन. तसेच ४० वर्षांपासून काम करत असलेली आणि हजारो बाबांचा, मात्रिकांचा, ज्योतिषांचा भांडाफोड करणारी आमची संस्था बंद करू,” असं खुलं आव्हान दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shyam manav again challenge dhirendra krishna maharaj about magic claims pbs
First published on: 21-01-2023 at 20:50 IST