scorecardresearch

धीरेंद्र कृष्ण महाराजांनी ३० लाखांचं आव्हान स्वीकारल्यानंतर श्याम मानव यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

अखिल भारत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं ३० लाख रुपयांचं बक्षीस आव्हान दिलं आहे.

धीरेंद्र कृष्ण महाराजांनी ३० लाखांचं आव्हान स्वीकारल्यानंतर श्याम मानव यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
धीरेंद्र महाराज व श्याम मानव (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अखिल भारत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं ३० लाख रुपयांचं बक्षीस आव्हान दिलं. यानंतर धीरेंद्र महाराजांनी नागपूरमध्ये हे आव्हान न स्वीकारता त्यांच्या दरबारात आव्हान स्वीकारलं. यावर आता श्याम मानव यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच महाराजांकडे माहिती मिळवण्याच्या यंत्रणा असल्याने त्यांनी हे आव्हान त्यांच्या दरबारात नाही, तर पत्रकार परिषदेत पंचसमितीच्या समोर स्वीकारावं, असं स्पष्ट केलं. ते शनिवारी (२१ जानेवारी) एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

श्याम मानव म्हणाले, “९ जानेवारीला आम्ही पत्रकार परिषद घेऊन धीरेंद्र महाराज दिव्य दरबारात जे दावे करतात त्याला आव्हान दिलं. हे महाराज दावा करतात की, ते भक्तांचं नाव आपोआप ओळखतात, भक्तांच्या वडिलांचं नाव आपोआप ओळखतात. एवढंच नव्हे तर त्यांचं वय आणि मोबाईल नंबरही सांगतात.”

“आव्हान दैवीशक्तीला नाही, तर महाराजांच्या दिव्यशक्तीला”

“याशिवाय धीरेंद्र महाराज कोणत्याही भक्ताच्या घरातील कोणत्या खोलीत, कोणत्या कपाटात कोणती वस्तू ठेवली हेही सांगण्याचा दावा करतात. या दाव्यातील पहिल्या भागाला टेलिपथी आणि इंट्युशन म्हणतात. तसेच घरात जाऊन काहीही पाहू शकण्याच्या क्षमतेला अंतर्ज्ञान किंवा दिव्यशक्ती (क्लेरोयान्स) म्हणतात. मी दैवीशक्तीला कोणतंही आव्हान दिलं नाही, तर महाराजांच्या दिव्यशक्तीला आव्हान दिलं आहे,” अशी माहिती श्याम मानव यांनी दिली.

हेही वाचा : नागपूर : धीरेंद्र कृष्ण महाराजांनी ३० लाखांचे आव्हान स्वीकारले पण…

“दावे करताना माहिती गोळा करण्याची यंत्रणा वापरली जाते”

श्याम मानव म्हणाले, “धीरेंद्र महाराजांच्या दाव्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रितसर वैज्ञानिक कसोट्यांवर आव्हान दिलं आहे. आम्ही पत्रकार परिषद घेऊन लिखित स्वरुपात हे आव्हान दिलं आहे. या आव्हानाच्या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण हे दावे करताना माहिती गोळा करण्याची यंत्रणा वापरली जाते. तशाप्रकारे आम्ही अनेक बाबांच्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे.”

हेही वाचा : विश्लेषण: ‘अंनिस’ने नागपूरमध्ये आक्षेप घेतलेले धीरेंद्र कृष्ण महाराज आहेत कोण? हा वाद काय?

“आव्हान प्रक्रिया महाराजांच्या दरबारात पार पडणार नाही”

“कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून दाव्या करणाऱ्यांपर्यंत माहिती पोहचू नये याची काळजी घेऊन ही आव्हान प्रक्रिया वैज्ञानिक कसोट्यांवर आयोजित करावी लागते. त्यासाठी आम्ही स्पष्टपणे म्हटलं की, ही आव्हान प्रक्रिया महाराजांच्या दरबारात पार पडणार नाही. ही प्रक्रिया नागपूरमधील सर्व पत्रकारांसमोर होईल. त्यासाठी एक तटस्थ पंचसमिती नेमली जाईल,” असंही श्याम मानव यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 15:33 IST

संबंधित बातम्या