विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे यांनी पिंपरीतील प्रभाग क्रमांक ९ मधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांच्या काही जुन्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ बनसोडे यांनी विरोधकांवर थेट आरोप करत प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधकांकडे सध्या कोणताही ठोस मुद्दा नसल्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत,” असं ते म्हणाले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, “त्या घटनेबाबत नागरिकांना सत्य माहिती नाही. जेव्हा ती घटना घडली, तेव्हा आमच्या कुटुंबाने खूप काही सहन केलं आहे.” उमेदवारी अर्ज भरताना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे विरोधक घाबरल्याचा दावा त्यांनी केला.दरम्यान, सिद्धार्थ बनसोडे यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून संपूर्ण पॅनल निवडून येईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे, सिद्धार्थ बनसोडे यांनी एबी फॉर्म नसताना उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चेला अधिकच उधाण आलं आहे. अद्याप पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची अधिकृत उमेदवार यादी जाहीर झालेली नसताना केवळ विधानसभा उपाध्यक्षांचे चिरंजीव असल्यामुळे त्यांनी अर्ज भरला का, अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
