Siddhivinayak Temple donation theft probe : अयोध्येतील राम मंदिर देणगी अपहार प्रकरण समोर आल्यानंतर आता मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील देणगी अपहार प्रकरण समोर आलंय. यामुळे राज्यातील वातावरणही तापलं आहे. सुरुवातीला काही कर्मचारी व्हीआयपी दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू झाली होती. मात्र त्याच तपासादरम्यान देणगीपेटीतून पैसे चोरले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणात आता विरोधकांनी भाजपावर टीका करायला सुरुवात केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरातून दरवर्षी तब्बल १८ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचा आरोप केला आहे. मात्र मंदिर प्रशासनाने हा आकडा फेटाळून लावत, संबंधित आरोपींना पकडून चोरीला आळा घातल्याचा दावा केला आहे.

CCTV फुटेज तपासताना उघड झाला प्रकार

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त राहुल लोंढे यांनी सांगितलं की, २०२३ च्या अखेरीस नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर व्हीआयपी दर्शनासाठी पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत होते. त्यावेळी काही कर्मचाऱ्यांकडून देणगीपेटीतून पैसे चोरले जात असल्याचं फुटेजमध्ये दिसून आलं. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि आरोपींना अटक करण्यात आली.

देणगी वाढत नसल्याने निर्माण झाला संशय

मंदिरात भाविकांची संख्या वाढत असतानाही देणगीचे उत्पन्न मात्र स्थिरच राहिल्याने विश्वस्तांना संशय आला. त्यानंतर मंदिराचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते सदा सरवणकर व विश्वस्त भास्कर शेट्टी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मदत घेतली. त्यावेळचे एसीबी प्रमुख विश्वास नांगरे-पाटील यांनी काही अधिकाऱ्यांना तपासासाठी नियुक्त केलं. सुरुवातीला काहीही संशयास्पद आढळलं नाही. मात्र तपास सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला.

CCTV कॅमेरा ब्लॉक केल्याने वाढला संशय

तपासादरम्यान देणगी मोजण्याच्या प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. याच काळात एका दिवशी देणगी मोजणीच्या ठिकाणचा सीसीटीव्ही कॅमेरा जाणीवपूर्वक झाकल्याचं आढळलं. त्यामुळे संशय अधिक बळावला. मार्च महिन्यात मंदिरातील कर्मचारी राजेंद्र पेंडुरकर याला पुजाऱ्यांच्या खोलीत ठेवलेल्या देणगीपेटीतून अधिकृत प्रतिनिधी अनुपस्थित असताना पैसे काढताना पकडण्यात आले. त्यानंतरच्या तपासात आणखी आठ कर्मचारी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं समोर आलं.

विश्वस्त राहुल लोंढे यांच्या म्हणण्यानुसार, “हे काम एकट्या व्यक्तीचं असू शकत नाही. तपासात संपूर्ण रॅकेट उघडकीस आलं. याशिवाय व्हीआयपी दर्शनासाठी पैसे घेण्यासारख्या गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्या आणखी १९ कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं.”

FIR आणि पोलिसांची कारवाई

या प्रकरणी २० मार्च रोजी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ८० हजार रुपये जप्त केले असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुमारे १० दिवसांच्या कालावधीत छोट्या देणगीपेटीतून वारंवार पैसे काढल्याचं दिसून आलं. अटक करण्यात आलेले आठही आरोपी सध्या जामिनावर असून, त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.

देणगी मोजण्याची प्रक्रिया कशी असते?

सिद्धिविनायक मंदिरात सुमारे ३० देणगीपेट्या दर बुधवारी उघडल्या जातात. आर्थिक अधिकारी आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने त्या सीलबंद केल्या जातात. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पेट्या उघडून निवडक कर्मचारी, शासन नियुक्त उपकार्यकारी अधिकारी आणि बँक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत रक्कम मोजली जाते. त्यानंतर ती रक्कम तातडीने बँकेत जमा केली जाते.

१८ कोटींच्या दाव्यावर वाद

राज ठाकरे यांनी दावा केला आहे की, चोरी उघडकीस येण्यापूर्वी मंदिराला दर आठवड्याला ५० लाख रुपयांपेक्षा कमी देणगी मिळत होती. मात्र आरोपींना अटक झाल्यानंतर आणि देखरेख कडक केल्यानंतर ही रक्कम सुमारे १.५ कोटी रुपयांपर्यंत वाढली. या अंदाजाने वर्षभरात १८ कोटी रुपयांच्या अपहाराचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र हा आकडा ना एफआयआरमध्ये आहे, ना आरोपपत्रात. मंदिर प्रशासनानेही हा दावा मान्य केलेला नाही.

पोलिसांचं म्हणणे काय?

दादर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “आम्ही आठ जणांना अटक केली होती. प्रत्येकाने सुमारे १० हजार रुपये अपहार केल्याचं आढळलं. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टला आणखी तपासाची गरज वाटत असेल, तर त्यांनी न्यायालयात दाद मागू शकतात.”

सरकारने मागवला आर्थिक अहवाल

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील विधी व न्याय विभागाने सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचा
सविस्तर अहवाल मागवला असून, आवश्यक असल्यास ऑडिट करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.