कोणताही महोत्सव थेट प्रसारीत करण्यासाठी एकच चढाओढ करणाऱ्या वृत्तवाहिन्यांना यंदाचा सिंहस्थ कुंभमेळा काहिसा दमादमाने प्रक्षेपित करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. कारण, शाही पर्वणीच्या दिवशी शाही स्नान होणारा नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील रामकुंड व कुशावर्त परिसर अतिशय दाटीवाटीचा असल्याने तिथे संबंधित वाहिन्यांना थेट प्रक्षेपणावर र्निबध घालण्यात आले आहेत. ‘दुरदर्शन’च्या सहाय्याने वृत्त वाहिन्यांना चित्रीकरण उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कुंभमेळ्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिला असून प्रशासन व पोलीस यंत्रणा तो नेटका पार पडावा यासाठी प्रयत्नशील आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यातील घडामोडी घरोघरी पोहोचविण्यासाठी वृत्त वाहिन्या सक्रिय झाल्या आहेत. मात्र, त्र्यंबकचे कुशावर्त आणि नाशिकमधील रामकुंड परिसरातील भौगोलिक स्थिती पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाने उपरोक्त ठिकाणी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींची गर्दी होणार नाही यासाठी काही र्निबध घातले आहेत. शाही पर्वणीच्या दिवशी नाशिक येथे ८० लाख तर त्र्यंबकेश्वर येथे ३० लाख भाविक येण्याचा अंदाज आहे.
चारुशीला कुलकर्णी, नाशिक