सावंतवाडी : सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. डोंगराचा कडा खचून मोठ्या प्रमाणावर मुरूम आणि माती रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे भुईबावडा घाटातील माती भुसभुशीत झाली होती. आज अचानक घाटातील मुख्य रस्त्यावर दरड कोसळली. सुदैवाने दरड कोसळली त्या क्षणी तिथून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ढिगारा साचल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने दोन्ही बाजूची वाहतूक तात्काळ थांबवली आहे.

​जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू

घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग पथके घटनास्थळी पोहचत आहेत. रस्त्यावरील मुरूम, माती आणि डोंगराचा मलबा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हातात घेतले जात आहे. ​”घाटात साचलेला मलबा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा ढिगारा पूर्णपणे काढून रस्ता सुरक्षित केल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली जाईल,” अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने वाहनधारकांना  शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. रस्ता पूर्णपणे साफ होऊन वाहतूक पूर्ववत होण्यासाठी काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.