सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रावण महिन्यात मुसळधार पाऊस नसला तरी शेतीला पूरक असा पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक वातावरण असतानाच, खारेपाटण-तिथवली-भुईबावडा-गगनबावडा राज्य महामार्ग १७१ वर किलोमीटर ३१.१५० दरम्यान अचानक दरड कोसळली आहे. दरड रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. रस्ता मोकळा करण्यासाठी जेसीबी थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचत असून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, श्रावण महिन्यातील हा पाऊस शेतीकामांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ३१.३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिमी):
देवगड ५०, कणकवली ४९, वैभववाडी ३७, कुडाळ ३६, सावंतवाडी ३१, दोडामार्ग २९, वेंगुर्ला ११ आणि मालवण येथे ०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
वाहनधारकांनी भुईबावडा घाट मार्गावरून प्रवास करताना काळजी घ्यावी आणि रस्ता पूर्ण मोकळा होईपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
