​सावंतवाडी: सिंधुदुर्गमधील ‘जीआय’ मानांकनप्राप्त काजू बि ला योग्य भाव मिळावा व काजूगरांना आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे, यासाठी सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघातर्फे बांदेश्वर दूध उत्पादक सहकारी संस्था, बांदा येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत इंडो-लॅटिन अमेरिका चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष श्री. व्ही. पी. व्ही. मूर्ती यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

​सिंधुदुर्गातील सेंद्रिय काजू आणि जीआय मानांकन असलेल्या काजूगरांना परदेशात प्रचंड मागणी आहे. कॉर्पोरेट जगतात जीआय मानांकित मालाचा मोठ्या प्रमाणात खप होतो. त्यामुळे जिल्ह्यात ‘ऑरगॅनिक अ‍ॅग्रीकल्चरल मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ स्थापन होणे अत्यंत आवश्यक असून, सिंधुदुर्ग फळबागायतदार संघाने यामध्ये पुढाकार घ्यावा, अशी सूचना श्री. मूर्ती यांनी केली. यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

​आपला काजू खरेदी करून हळदीरामसारख्या कंपन्या मार्केटिंगच्या जोरावर प्रचंड नफा कमवत आहेत. हाच नफा शेतकरी सहकारी संस्थेच्या माध्यमातून स्वतः मिळवू शकतात, असे सांगताना त्यांनी तामिळनाडू व इतर ठिकाणच्या यशस्वी सहकारी संस्थांची उदाहरणे दिली. तसेच बारामती पॅटर्नचे कौतुक करत, योग्य मार्केटिंगमुळे २५०० रुपये प्रति बॉटल दराने परदेशात विकल्या जाणाऱ्या ‘मोग रस’ ब्रँडचे स्वतःचे उदाहरणही त्यांनी दिले. जगभरातील मार्केटिंग मॉल्स सिंधुदुर्गातील काजूसाठी उत्सुक असल्याने येत्या हंगामात काजू प्रक्रिया करून आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले.

​‘ऑरगॅनिक को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ स्थापन करण्याचा निर्णय

​श्री. मूर्ती यांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केल्यानंतर, जिल्ह्यात ‘ऑरगॅनिक अ‍ॅग्रीकल्चरल मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह संस्था’ स्थापन करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. १० संचालक आणि २०० भागधारक निर्धारित करून इतर शेतकऱ्यांना सामान्य सदस्यत्व दिले जाईल. येत्या आठवड्याभरात संचालकांची नावे अंतिम करून नोंदणी प्रक्रियेला गती दिली जाईल, असे अध्यक्षीय भाषणात विलास सावंत यांनी स्पष्ट केले.

​या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग फळबागायतदार संघटनेचे अध्यक्ष श्री. विलास सावंत होते. व्यासपीठावर सह्याद्री काजू प्रक्रिया सहकारी संस्थेचे चेअरमन चंद्रशेखर देसाई, नर्सरी संघटनेचे विकास माडगूत, प्रगतशील शेतकरी विजय प्रभू व संजय देसाई उपस्थित होते. या बैठकीला जिल्हाभरातून ५० हून अधिक प्रगतशील काजू उत्पादक शेतकरी व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.