सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा बदलत्या हवामानाचा मोठा फटका काजू पिकाला बसला असून, बागायतदार दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे बाजारपेठेत अपेक्षेपेक्षा कमी मिळणारा दर यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथील शनिवारच्या आठवडा बाजारात आज काजू बीला १७२ रुपये प्रति किलो इतका दर मिळाला.

​भेडशी बाजारात आवक वाढली, दर घटले:

​साटेली-भेडशी परिसरात व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर काजूची शेती केली जाते. येथील काजू उच्च दर्जाचा असल्याने गोवा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातील इतर भागांतील कारखानदार या बाजाराला पसंती देतात. हंगामाच्या सुरुवातीला काजू बी ला दर १८० रुपये होता. मात्र, आवक वाढताच हा दर आता १७२ रुपयांवर खाली घसरला आहे. बागायतदारांना यंदा किमान २०० रुपये दर मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली आहे.

​आयात काजूचा स्थानिक दरावर परिणाम:

​काजू दरात घट होण्यामागे जागतिक बाजारपेठेतील घडामोडी कारणीभूत असल्याचे स्थानिक खरेदीदारांचे म्हणणे आहे. “मोठे कारखानदार परदेशातील स्वस्त काजूची आयात करत असल्याने स्थानिक काजूच्या दरात घसरण होत आहे,” असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

​हेक्टरी ३ लाखांच्या भरपाईची मागणी:

​हवामानातील बदलांमुळे काजूच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. कडक उन्हात कष्ट करून बी गोळा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती खर्चाच्या तुलनेत कमी उत्पन्न पडत आहे. या पार्श्वभूमीवर, विधिमंडळ अधिवेशनात सरकार काजू पिकासाठी काय मदत जाहीर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बागायतदारांनी शासनाकडे प्रति हेक्टरी ३ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.