सावंतवाडी: आखाती देशांमध्ये सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने तेथील जिल्हावासीयांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत एकूण १२५ नागरिकांनी प्रशासनाकडे आपली नोंदणी केली असून, त्यापैकी १५ जणांनी तातडीने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे सर्व नागरिक सध्या सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, आखाती देशांत असलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३ मार्चपर्यंत ११२ नागरिकांनी आपली नोंदणी केली होती, त्यापैकी १२ जणांनी त्वरित परतण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र, बुधवारी या संख्येत वाढ झाली असून आता एकूण १२५ नागरिकांनी आपली माहिती प्रशासनाकडे दिली आहे. यामध्ये तातडीने परत येणाऱ्यांची संख्या ३ ने वाढून १५ वर पोहोचली आहे.
देशनिहाय तपशील:
तातडीने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केलेल्या १५ नागरिकांमध्ये दुबईतील ६, कुवेतमध्ये ४, कतारमधील २ आणि बहारीन, सौदी अरेबिया व अबुधाबी येथील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. प्रशासनाकडून दररोज या माहितीचा आढावा घेतला जात असून, नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या १५ व्यक्तींना तातडीच्या मदतीची गरज असून जिल्हा प्रशासन त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करत आहे.
