सावंतवाडी : निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आज (मंगळवार, १० जून) ‘सिंधू पॅटर्न’ वटसावित्री वटपौर्णिमा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. वडाच्या फांद्या तोडण्याऐवजी वटवृक्षाचे रोपण करून आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या विशेष कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील, त्यांच्या पत्नी श्रीमती सुनिता पाटील, अपर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आरती देसाई, उपजिल्हाधिकारी भूसंपादन श्रीमती शारदा पोवार, तहसीलदार पुनर्वसन श्रीमती शितल जाधव, तहसीलदार महसूल श्रीमती चैताली सावंत, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांच्यासह इतर विभागांच्या महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना उपजिल्हाधिकारी भूसंपादन श्रीमती शारदा पोवार यांनी सांगितले की, वटपौर्णिमेला वडाच्या फांद्या तोडून पूजा करण्याऐवजी प्रत्येकाने वडाचे झाड लावून निसर्गाचे संतुलन राखण्यास हातभार लावावा, या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आरती देसाई यांनी पती-पत्नीमधील प्रेम आणि विश्वासाप्रमाणेच वृक्षांचे संवर्धन करणे आणि त्यांचे संगोपन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. वृक्षसंगोपणाचे हे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवणे हाच या आयोजनाचा मुख्य हेतू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांनी अशा वेगळ्या वटपौर्णिमा आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, “वडासारखा महत्त्वपूर्ण वृक्ष आपण जपला पाहिजे. झाडांच्या फांद्या तोडून पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्याऐवजी प्रत्येकाने वृक्षलागवड करून, त्यांची काळजी घेऊन आणि त्यांचे संवर्धन करून पर्यावरण रक्षणात हातभार लावणे ही आजच्या काळाची गरज आहे.” प्रत्येक वटपौर्णिमेला वृक्षसंवर्धनाचे कर्तव्य लक्षात ठेवून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या पत्नी श्रीमती सुनिता पाटील यांनी जिल्हा प्रशासनातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे म्हटले. अशा कार्यक्रमांतून पर्यावरण संवर्धनाचे काम होते आणि इतरांनीही यातून प्रेरणा घेऊन अशा प्रकारचे उपक्रम ठिकठिकाणी साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी केले, तर तहसीलदार महसूल श्रीमती चैताली सावंत यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिला वर्गाने विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले. उपस्थित मान्यवर आणि सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना वटवृक्षाचे रोपवाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तसेच सिंधुदुर्ग नगरी प्राधिकरण क्षेत्रात श्रीमती सुनिता पाटील यांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी वटवृक्षाचे पूजनही करण्यात आले. अशा प्रकारे, जिल्हा प्रशासनातील सर्व महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात वटपौर्णिमा सण एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम पर्यावरण संवर्धनासाठी एक सकारात्मक संदेश देणारा होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालय आवारात २५ वटवृक्ष रोप रोपण करण्यात आले तर उपस्थित कर्मचारी यांना शंभर वटवृक्ष रोप वाटप करण्यात येऊन ती संवर्धन करण्याचा संदेश दिला.