​सावंतवाडी: दोडामार्ग तालुक्यातील कोलझर, तळकट आणि शिरवल परिसरात हत्तींच्या कळपाने घातलेल्या धुमाकुळाने शेतकरी आक्रमक झाले आहेत. काजू हंगामाच्या ऐन भरात हत्तींनी बागांमध्ये ठाण मांडल्याने उत्पन्नाचे साधन धोक्यात आले आहे. “येत्या चार दिवसांत हत्तींना हटवले नाही, तर वन विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू,” असा थेट इशारा कोलझर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी दिला आहे. ​बुधवारी संतप्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली. उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा मुंबईत असल्याने सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी वन विभागाच्या ‘नाकर्तेपणा’वर कडाडून टीका केली.

​’वनतारा’च्या प्रयोगावर संताप

गेल्या वर्षी याच हंगामात हत्तींचा अभ्यास करण्यासाठी ‘वनतारा’ प्राणी संग्रहालयाचे तज्ज्ञ आले होते. त्यावेळी हत्तींना परिसरातून हटवू नका, अशी भूमिका वन विभागाने घेतली होती. या अजब प्रयोगामुळे हत्ती या भागात दीर्घकाळ स्थिरावले आणि त्यांनी नारळ, सुपारी व काजू बागांचे कोट्यवधींचे नुकसान केले. वन विभागाने शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन हा खेळ रचला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

​काजू सडून जाण्याची भीती

सध्या काजूचा मुख्य हंगाम सुरू आहे. हत्ती बागेत असल्याने शेतकरी काजू गोळा करायला जायला घाबरत आहेत. वेळेवर काजू न गोळा केल्यास ते झाडाखालीच सडून जात आहेत. “पुढचा संपूर्ण महिना उत्पन्नाचा काळ आहे, अशा वेळी बागेत जाता आले नाही तर वर्षभर प्रपंच कसा चालवायचा?” असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे. हत्तींच्या दहशतीमुळे एखाद्या शेतकऱ्याचा बळी गेल्यास त्याला वन विभागच जबाबदार राहील, असेही ग्रामस्थांनी सुनावले. ​यावेळी ​हत्तींना हटवण्यासाठी तातडीने विशेष मोहीम राबवावी.​तातडीने दोन अतिरिक्त ड्रोन उपलब्ध करून द्यावेत.
​हत्तींचा शिरकाव रोखण्यासाठी ‘केर’ ते ‘कोलझर’ मार्गावर सौर ऊर्जेवर चालणारे हँगिंग कुंपण उभारावे.​सायरन यंत्रणा आणि लोकेशन यंत्रणेतील त्रुटी दूर कराव्यात.

​नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. हत्तींना या भागातून हटवण्याबाबत आज बुधवार संध्याकाळपासूनच कार्यवाही सुरू केली जाईल. तसेच पुढील १० दिवसांत नुकसानीचा पंचनामा करून अहवाल शासनाकडे पाठवला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. ​या चर्चेत पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, सरपंच सुजल गवस, देवस्थान कमिटी अध्यक्ष शामराव देसाई, आपा देसाई, महादेव देसाई, रोहन देसाई, दिलीप देसाई, विलास देसाई, अमर सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.