सावंतवाडी : गेल्या २३ वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यात जंगली हत्तींनी घातलेल्या धुमाकुळाला कंटाळून, आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जनआंदोलन तीव्र झाले आहे. सरपंच सेवा संघटनेचे अध्यक्ष प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, “दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करा,” या मागणीवर आंदोलक ठाम आहेत.
कर्नाटक सीमेवर हत्तींचा वावर; पुन्हा शिरकाव होण्याची शक्यता
एकीकडे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कणकुबी, मान आणि चिगुळा परिसरात १२ हत्तींचा कळप दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. हे हत्ती कोणत्याही क्षणी दोडामार्ग तालुक्यात शिरकाव करण्याची दाट शक्यता आहे. कर्नाटक राज्यातील या हत्तींना त्यांच्या मूळ अधिवासात पाठवण्यासाठी तातडीने ‘हत्ती पकड मोहीम’ राबवण्याची मागणी प्रविण गवस यांनी केली आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा निष्फळ
आंदोलनाची तीव्रता पाहून सावंतवाडी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि सहाय्यक वन संरक्षक वैभव बोराटे यांनी दोडामार्ग वन कार्यालयात धाव घेतली. त्यांनी प्रविण गवस, संजय देसाई, तुकाराम बर्डे, दत्ताराम देसाई आणि उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त होत नाही आणि तालुका हत्तीमुक्त करण्याची लेखी ग्वाही मिळत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
- गेल्या दोन दशकांपासून शेतीचे नुकसान करणाऱ्या हत्तींना पकडून अन्यत्र हलवावे.
- कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणाऱ्या नवीन हत्तींना रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
- केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कृती करून दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करावा.
”आम्ही गेल्या २३ वर्षांपासून सहन करत आहोत. आता आमच्या संयमाचा अंत झाला आहे. जोपर्यंत दोडामार्ग तालुका पूर्णपणे हत्तीमुक्त होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.” असे प्रविण गवस (अध्यक्ष, सरपंच सेवा संघटना) यांनी म्हटले आहे. या आंदोलनामुळे वन विभागाची चांगलीच धावपळ उडाली असून, शासन आता यावर काय ठोस पाऊल उचलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान पाच हत्तींचा वावर दोडामार्ग तालुक्यात आहे. बागायतीची प्रचंड नुकसान करत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
