​सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यासह जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. शेतीची प्रत्यक्ष वस्तुस्थिती शासनासमोर मांडून बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकद लावू, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज येथे दिली.

​पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-बादेवाडी येथील शेतकरी भास्कर गावकर यांच्या भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी करपून गेलेली भातशेती, आटलेल्या विहिरी आणि नद्यांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

​यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले की, राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त यादीत ‘ट्रिगर वन’मध्ये आले असून, त्यात सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ‘ट्रिगर वन’ अंतर्गत मिळणारी मदत ही योग्य पद्धतीने आणि जास्तीत जास्त गरजूंंपर्यंत पोहोचावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

​यंदा पाऊस नसल्याने भातशेतीची वाढ खुंटली असून विहिरींतील पाणीसाठाही वेगाने घटत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सिंधुदुर्गात पडणारे पावसाचे पाणी छोट्या बंधाऱ्यांच्या माध्यमातून अडवून साठवण्याचे नियोजन आहे. यासाठी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावण्यात आली असून, भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आवश्यक निर्देश दिले जातील. महायुती सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मुख्यमंत्री लवकरच कोकण दौऱ्यावर येऊन परिस्थितीचा आढावा घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​‘जलतारा’ उपक्रमाचा शुभारंभ

या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ‘विकसित भारत रोजगार व आजीविका अभियाना’अंतर्गत ‘जलतारा’ कामाचा शुभारंभ करण्यात आला. छोट्या खड्ड्यांच्या माध्यमातून भूगर्भातील पाणीपातळी वाढवणे आणि जलसाठवणूक करणे हा यामागचा मुख्य उद्देश असून गावागावांत ही कामे हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

​या पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, प्रांताधिकारी विरसिंग वसावे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, गटविकास अधिकारी निलेश जाधव, भाजप मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, संतोष राऊळ, मळगावचे माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, चंद्रकांत जाधव, संदेश सोनुर्लेकर यांच्यासह विविध पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.