सावंतवाडी: हवामान बदलामुळे आंबा आणि काजू पिकाचे झालेले ९० टक्के नुकसान आणि आर्थिक संकटामुळे हवालदिल झालेल्या सिंधुदुर्गातील बागायतदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो बागायतदार सहभागी झाले होते.
आंबा पिकाला हेक्टरी ५ लाख तर काजूला ३ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी स्वतः व्यासपीठावर येत आंदोलकांशी संवाद साधला.
राजू शेट्टी यांचा इशारा:
मोर्चाला संबोधित करताना राजू शेट्टी म्हणाले की, “आज १२ मार्च, म्हणजेच गांधीजींच्या दांडी यात्रेचा ऐतिहासिक दिवस आहे. ९६ वर्षांनंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. कोकणातील बागायतदाराने ५० वर्षांत कधीही सरकारकडे मागणी केली नाही, पण आज नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. औषध कंपन्या आणि दलालांनी शेतकऱ्यांना लुटले आहे. जर येत्या १० दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर २३ मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडले जाईल.”
पालकमंत्र्यांचे आश्वासन:
पालकमंत्री नितेश राणे यांनी आंदोलकांना आश्वस्त करताना सांगितले की, “शेतकरी रस्त्यावर असताना मी विधिमंडळ अधिवेशन सोडून त्यांना भेटायला आलो आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ९० टक्के नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला आहे. चुकीचे अहवाल मी स्वतः बदलून घेतले आहेत. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल. सरकार बागायतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”
या मोर्चात माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, विलास गावडे, अमित सामंत, धिरज परब, एम. के. गावडे, डॉ. जयेंद्र परुळेकर, जयप्रकाश चमणकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि हजारो बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.राजू शेट्टी म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. पण बैठक कशाला घेता. नैसर्गिक आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करावी त्यासाठी बैठक कशाला हवी आहे.
शेतकऱ्यांनी करेंगे या मरेंगे या महात्मा गांधी यांच्या विचारांचे स्मरण करून २३ मार्चला आंदोलन सहभागी व्हा. पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, शेतकरी आमचेच आहेत. आम्ही सरकार मध्ये आसलो तरी मी विधिमंडळ अधिवेशन सोडून शेतकऱ्यांना भेटायला आलो आहे. मी, खासदार नारायण राणे आणि कोकणातील आमचे आमदार केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकरी आक्रोश मोर्चाला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. उन्हाचे चटके बसत असूनही ते आले होते. पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळ अधिवेशन सोडून ओरोस गाठले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोंकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलाच आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने बागायतदार उपस्थित होते.
