सावंतवाडी: सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बुरुजाच्या तळभागातील तटबंदीचा काही भाग ढासळल्याचे वृत्त समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) विभागाने तात्काळ पावले उचलली आहेत. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या घटनेची दखल घेत महसूल प्रशासनामार्फत ‘ASI’ला पत्र पाठवून पाहणी व आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्त्वविद डॉ. अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने १९ जुलैच्या संध्याकाळी दुर्घटनाग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकात रायगड उप-मंडळाचे संरक्षण सहाय्यक संकेत कावलकर, मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, देवबागचे ग्राम महसूल अधिकारी श्री. वायाळ व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या पाहणीदरम्यान ढासळलेल्या बुरुजाची सद्यस्थिती, तटबंदीची संरचनात्मक स्थिरता आणि दगडी बांधकामाची अवस्था तपासण्यात आली. तसेच समुद्री लाटा, भरती-ओहोटी आणि पावसाचा या भागावर झालेला परिणाम लक्षात घेऊन आवश्यक ती तांत्रिक निरीक्षणे नोंदवण्यात आली व मोजमापे घेण्यात आली.
या पाहणीचा सविस्तर अहवाल भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई मंडळाकडे सादर केला जाणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर किल्ल्याच्या दुरुस्ती व संवर्धनाबाबतची पुढील कार्यवाही निश्चित केली जाईल. historic वारशाचे जतन करण्यासाठी ASI कडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे संरक्षण,जतन व्हावे म्हणून शिवप्रेमी सातत्याने प्रयत्न करत आहेत. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर आहे तर शिवप्रेमी पर्यटक मंदीराला भेट देत किल्लाची पाहणी करतात.
