सावंतवाडी : गेल्या साडेतीनशेहून अधिक वर्षे समुद्राच्या अथांग लाटांशी झुंज देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी आरमाराची साक्ष देणारा ऐतिहासिक ‘किल्ले सिंधुदुर्ग’ सध्या शासकीय अनास्थेचा बळी ठरत आहे. किल्ल्याच्या पूर्वेकडील उजव्या बाजूच्या दोन नंबरच्या बुरुजाच्या भिंतीला पाव्याच्या ठिकाणी तब्बल तीन मीटर रुंदीचे मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या भगदाडामुळे आजूबाजूचे दगडही कोसळण्याच्या स्थितीत असून, संपूर्ण भिंतीलाच मोठा धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानाचे स्थान मिळालेल्या या किल्ल्याच्या दुरवस्थेमुळे शिवप्रेमी, किल्ले प्रेमी आणि स्थानिक रहिवाशांमधून तीव्र चिंता व संताप व्यक्त होत आहे.

​रहिवशांच्या पाहणीतून प्रकार उघड:

​किल्ल्याच्या पूर्वेकडील बुरुजाला भगदाड पडल्याची बाब स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आली होती. यानंतर किल्ले रहिवासी मंगेश सावंत यांनी स्वतः किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूने उतरून या जागेची पाहणी केली. हे भगदाड अगदी नवीन असून त्याची रुंदी सुमारे तीन मीटर आहे. या ठिकाणचे ऐतिहासिक दगड निखळून पडले असून, बाजूच्या उर्वरित दगडांनाही मोठ्या भेगा पडल्या आहेत. हे दगडही कोणत्याही क्षणी कोसळू शकतात, अशी भीती सावंत यांनी व्यक्त केली आहे.

​लाटांचा मारा नसलेल्या बाजूला पडले भगदाड:

​साधारणपणे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागाला समुद्राच्या लाटांचा थेट तडाखा बसतो. यापूर्वी या भागात भिंतींना तडे गेले असून छोटी भगदाडेही पडली आहेत. मात्र, आता लाटांचा थेट मारा न होणाऱ्या पूर्वेकडील संथ पाण्याच्या बाजूचे पाव्याचे दगड कोसळल्याने ही अधिक चिंतेची बाब मानली जात आहे.

​पुरातत्व विभागाच्या कारभारावर रहिवाशांचा संताप:

​सिंधुदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट झालेला असतानाही केंद्रीय पुरातत्व विभागाकडून यांच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

पुरातत्त्व विभाग झोपी गेला….

​”आम्ही गेल्या दहा पिढ्यांपासून सिंधुदुर्ग किल्ल्यात राहत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात उभारलेल्या आणि त्यांच्या सागरी आरमाराची मुख्य राजधानी असलेल्या या पवित्र किल्ल्याची आजची दुरवस्था पाहून मन हेलावून जाते. पुरातत्व विभाग पूर्णपणे झोपी गेला असून त्यांना या ऐतिहासिक ठेव्याची काहीही काळजी नाही.”— मंगेश सावंत (किल्ले रहिवासी)

​तातडीने डागडुजी करण्याची मागणी:

​किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज दिवसेंदिवस कमकुवत होत चालले असून पुरातत्व विभागाने वेळीच उपाययोजना न केल्यास हा ऐतिहासिक ठेवा कायमचा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता तरी शासनाने आणि संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन सिंधुदुर्ग किल्ल्याची तातडीने डागडुजी करावी, अशी आग्रही मागणी किल्ले रहिवासी आणि शिवप्रेमींकडून केली जात आहे.