सावंतवाडी : सिंधुदुर्ग किल्ल्यावर होडीतून जाणाऱ्या प्रवासी संख्येवरून निर्माण झालेला वाद क्षमला! मालवणला सिंधुदुर्ग किल्ला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या किल्ल्यावर होडीतून जावं लागतं.मध्यप्रदेशातील जबलपूर येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षेच्या कारणास्तव मालवण बंदर विभागाने सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुकीमध्ये एका होडीतून केवळ २० पर्यटक प्रवासी नेण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयामुळे रविवारी होडी व्यावसायिक आणि बंदर अधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला , परिणामी काही काळ होडी सेवा बंद ठेवण्यात आली होती.

सध्या महत्त्वाचा पर्यटन हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणावर पर्यटक मालवणमध्ये दाखल होत आहेत. अशा वेळी एका होडीतून केवळ २० पर्यटक नेणे परवडणारे नसल्याची व्यथा होडी व्यावसायिकांनी मांडली. तसेच, डिझेल/पेट्रोलच्या वाढत्या दरांचा फटका बसत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, यासोबतच आम्ही सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत असून, पर्यटकांना लाईफ जॅकेट घालण्याची सक्ती करत आहोत, असे स्पष्टीकरणही व्यावसायिकांनी दिले.

​वादानंतर बंदर विभाग अधिकारी व होडी व्यावसायिक यांच्यात चर्चा झाली. या चर्चेतून एका होडीत ३० प्रवासी नेण्यास परवानगी देण्यात यावी, असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आल्याने या वादावर पडदा पडला. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
​छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी सध्या पर्यटक व शिवप्रेमी मावळे मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. सेवा सुरळीत झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे.