सावंतवाडी: आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या चर्चांदरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ६० पेट्रोलपंपांपैकी ५२ पेट्रोल पंप रितसर सुरू असून केवळ ८ पंपांवर तांत्रिक अडचणींमुळे इंधनाचा तात्पुरता तुटवडा असल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून इंधनाचा अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ६ पेट्रोलपंपांवर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांचा तात्पुरता तुटवडा आहे. उर्वरित २ पेट्रोलपंपांपैकी एका पंपावर केवळ पेट्रोल, तर दुसऱ्या पंपावर केवळ डिझेल उपलब्ध आहे. संबंधित कंपन्यांचे विक्रय प्रतिनिधी आणि डेपो व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पंपांवर इंधन संपले आहे, तिथे नवीन टँकर लोड करण्यात आले असून उद्यापर्यंत येथील परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत होईल.
साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), इंडियन ऑईल (IOCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहे. दरम्यान, कृत्रिम दरवाढ किंवा इंधन साठेबाजीचे प्रकार रोखण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथके सक्रिय करण्यात आली आहेत. पेट्रोलपंपांची अचानक तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
आंतरराष्ट्रीय युद्धाचा स्थानिक पातळीवर फटका
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा थेट फटका आता स्थानिक पातळीवर बसू लागला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवू लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील या विस्कळीत पुरवठ्यामुळे देशात महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत चालला असून पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना इंधन आणि एलपीजी गॅसचा वापर अत्यंत जपून व काटकसरीने करण्याचे आवाहन केले होते.
ग्राहकांची गर्दी
जिल्ह्यात काही पेट्रोल पंपावर दुचाकीला २००, तर चारचाकीला ५०० रुपयांचेच इंधन दिले जात आहे. तर काही ठिकाणी दुचाकीला ५०० रूपये तर चारचाकी वाहनांना १ हजार रुपयांचे पेट्रोल दिले जात आहे. इंधन टंचाईच्या भीतीपोटी पेट्रोल पंपांवर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर व पंप चालकांकडून काटकसरीचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार सध्या दुचाकी वाहनांना एका वेळी मर्यादित इंधन वितरणामुळे वाहनधारकांमध्ये काहीसा गोंधळ आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत त्यामुळे पेट्रोल व डिझेल ची अचानक मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पंपावर वाहनांची गर्दी वाढत आहे.
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
एकीकडे सातत्याने होणारी दरवाढ आणि दुसरीकडे आता सुरू झालेली इंधन कपात, यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार आणि व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. इंधनाचा हा तुटवडा पुढील काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने जनतेमधील चिंता अधिक वाढली आहे.
