सावंतवाडी: आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होणार असल्याच्या चर्चेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा खंडित होईल, या भीतीने सावंतवाडीसह जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
मंगळवारी रात्रीपासूनच पेट्रोल पंपांवर नागरिकांनी इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील काही पंपांवर इंधनाचा तुटवडा भासत असल्याने ग्राहकांनी शहरांतील पंपांकडे धाव घेतली. सावंतवाडी शहरात मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपांवर वाहनांच्या झुंबडी उडाल्याचे चित्र होते. ही गर्दी बुधवारी देखील कायम असल्याचे दिसून आले. इंधनासोबतच गॅस कार्यालयासमोरही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.
जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा असल्याचे वृत्त केवळ अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शहरांमधील पंपांवर सध्या मुबलक प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊन गर्दी करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
