सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाडक्या गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली असून ७४ हजार ३५१ खाजगी/घरगुती गणपती आणि ३२ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत श्रींची स्थापना होणार आहे. १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या उत्सवासाठी गावोगावी, वाड्यावस्त्यांवर उत्साहाचे वातावरण पसरले आहे. मुंबई-पुण्याहून मोठ्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत.
बाजारपेठांमध्ये पूजा साहित्य आणि सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. गणेशमूर्ती शाळांमध्ये मूर्तींना रंगरंगोटीचा अंतिम हात फिरवला जात असून घरांची साफसफाई, रंगरंगोटी व रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यात दीड ते अकरा दिवसांपर्यंत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.
सार्वजनिक गणपती (एकूण ३२ ठिकाणे):
सावंतवाडी: ७
कणकवली: ५
दोडामार्ग: ४
कुडाळ: ४
वैभववाडी: ४
वेगुर्ला: ३
मालवण: २
आचरा: १
बांदा: १
देवगड: १
घरगुती (खाजगी) गणपती (एकूण ७४,३५१):
कणकवली: ९,७१०
सावंतवाडी: १०,१०३
कुडाळ: १०,१४५
देवगड: ६,५४०
दोडामार्ग: ६,०३२
विजयदुर्ग: ५,५७२
वेगुर्ला: ५,४८९
वैभववाडी: ५,३४५
मालवण: ४,५०६
निवती: ३,३०२
बांदा: २,६९५
सिंधुदुर्गनगरी: २,४९५
आचरा: २,४२५
पोलीस व प्रशासकीय यंत्रणा सज्ज:
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व बस व रेल्वे स्थानके, महामार्ग आणि सर्व घाट मार्गांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन; रेल्वे, गाड्या फुल्ल:
गणेशोत्सव सणासाठी नोकरीनिमित्त शहरात राहणारे चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या गावी दाखल होत आहेत. कोकण रेल्वेमार्गासह एसटी बस आणि खासगी वाहनांना प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. चाकरमान्यांच्या गर्दीमुळे रेल्वेने जादा फेऱ्या सोडल्या आहेत. सणाच्या निमित्ताने वर्षभर बंद असलेली अनेक घरे उघडली असून, त्यामुळे गावांमधील वातावरण गजबजून गेले आहे. दीड, पाच, सात, नऊ आणि अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचा आनंद लुटल्यानंतर हे नागरिक पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतील. सध्या तरी सावंतवाडीसह संपूर्ण कोकणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्साह दिसून येत आहे.
