सावंतवाडी:सिंधुदुर्गातील चिरे, रेती आणि खडी वाहतूक करणारे ट्रक व्यावसायिक आणि स्थानिक चिरेखाण व्यावसायिक यांच्यातील वाद मिटवण्यासाठी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. पुढील आठ दिवसांच्या आत सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून यावर योग्य तोडगा काढला जाईल, असे आश्वासन आमदार राणे यांनी दिले आहे.
गोव्याचे पेडणे येथील आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या निवासस्थानी यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला गोवा आणि सिंधुदुर्ग येथील व्यावसायिक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत गोव्यातील ट्रक, रेती, चिरे आणि खडी व्यावसायिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. सिंधुदुर्गातून माल आणताना आकारले जाणारे वाढीव दर, विविध शुल्क आणि जांभा दगडाचे (चिऱ्यांचे) वाढलेले भाव यामुळे हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडेनासा झाला आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक ट्रक मालकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली असून, यात शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न अडकला असल्याचे व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेट्ये यांनी सांगितले.
व्यावसायिकांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर आमदार निलेश राणे म्हणाले, “सिंधुदुर्ग आणि गोव्याचे नाते अत्यंत जुने आणि घट्ट आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याशी आमचे सलोख्याचे संबंध आहेत. दोन्ही राज्यांतील व्यावसायिकांचे हित जपणारा निर्णय घेतला जाईल. यासाठी पुढील आठ दिवसांत सिंधुदुर्गातील रेती व खाण व्यावसायिकांची स्वतंत्र बैठक घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही असा मार्ग काढला जाईल.”
आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीची माहिती देत, व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले.बैठकीच्या शेवटी ट्रक व्यावसायिकांच्या वतीने आमदार निलेश राणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेट्ये, सिंधुदुर्गचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
