सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतकोत्तर काळापासून ग्रंथालय चळवळ अधिक प्रगल्भ होत आहे. जिल्हयातील १० ग्रंथालयांनी आपली १०० ते १५० वर्षे पूर्ण केली असून, अशा ‘शतायु’ ग्रंथालयांचा सन्मान होणे ही अभिमानास्पद बाब आहे. मात्र, आता बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार ग्रंथालयांनीही बदलायला हवे. वाचक ग्रंथालयापर्यंत कसा येईल, यासाठी ग्रंथपालांनी अधिक सक्रिय व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी केले.

​उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील श्री महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित दोन दिवसीय ‘सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२५’ चा समारोप उत्साहात झाला. यावेळी जिल्ह्यातील जुन्या व प्रतिष्ठित १० ग्रंथालयांचा विशेष गौरव करण्यात आला.

समारोप कार्यक्रमात ग्रंथालयांच्या संस्थाचालक व कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला:

रा. ब. अनंत शिवाजी विद्यालय वाचनालय (कुडाळ), श्रीराम वाचन मंदिर (सावंतवाडी), नगर वाचनालय (शिरोडा), रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालय (शिरोडा), श्रीराम वाचनालय (होडावडे), नट वाचनालय (बांदा), नगर वाचनालय (मालवण), श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर (आचरा), भरड शिवाजी वाचन मंदिर (मालवण) आणि वाडे-देवगड येथील सौ. मालती जनार्दन जोशी मोफत वाचनालय व डॉ. वि. वा. नेने ग्रंथालय यांचा समावेश आहे.

यावेळी आयोजित चर्चासत्रात राज्यस्तरीय ग्रंथपाल पुरस्कार विजेते संजय शिंदे, पूनम नाईक, अक्षता सावंत आणि सिद्धेश राऊळ यांनी मते मांडली. ग्रंथपाल हा वाचक आणि ग्रंथ यांमधील महत्त्वाचा दुवा असून, नव्या स्वरूपातील वाचक टिकवण्यासाठी नाविन्यपूर्ण बदल स्वीकारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शासनाने ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

​पुढील वर्षी ५० वर्ष पूर्ण झालेल्या ग्रंथालयांचाही गौरव करण्यात येईल, असे मंगेश मस्के यांनी जाहीर केले. या प्रसंगी राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार विजेते अनंत वैद्य, श्रीराम वाचन मंदिरचे कार्यवाह रमेश बोंद्रे, अरविंद शिरसाट यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘आनंद यात्रा’ कार्यक्रमातून प्रसाद कुलकर्णी यांनी वाचन संस्कृतीवर प्रकाश टाकला.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन पांचाळ यांनी केले, तर आभार प्रतिभा पाटणकर यांनी मानले. ग्रंथोत्सव यशस्वी करण्यासाठी सतीश गावडे, गुरुनाथ मडवळ, ॲड. संतोष सावंत, जयेंद्र तळेकर, डॉ. विवेक पाटणकर, कैलास पवार, प्रसाद जाधव, किशोर कांबळे, सागर भोसले, हेमंत शिरसाठ, वैभव कोरगावकर, प्रियल रणसिंग, नितीन कुडाळकर, बापू सावंत, स्वप्नाली आजगावकर आदींनी परिश्रम घेतले.