सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझड सुरू झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दुपारी करुळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडली, तर देवगड-दहिबाव रस्त्यावर वडाचे प्रचंड झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, कुडाळ तालुक्यातील आकेरी येथे एका व्यक्तीचा पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग (खारेपाटण) कडून मिळालेल्या माहितीनुसार, तळेरे–गगनबावडा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी वरील करूळ घाटात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास साखळी क्रमांक २९+३०० जवळ दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग विभागाची यंत्रणा तातडीने ढिगारा उपसण्यासाठी घटनास्थळी दाखल झाली असून, वाहतुकीचा अडथळा दूर करून मार्ग पूर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दुसरीकडे, देवगड-दहिबाव इंदिरा आवास वाडी येथे रस्त्यावर वडाचे मोठे झाड कोसळल्याने देवगड-मालवण रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या पडझडीमुळे प्रशासनाने एसटी व इतर वाहनांचे मार्ग तात्पुरते बदलले आहेत. देवगड-आचरा मार्गावरील गाड्या आता आडीवरे मार्गे चालवल्या जात असून, मिठबाव-तांबलडेग मार्गे जाणाऱ्या बसेस कुणकेश्वर मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कुडाळ तहसीलदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ तालुक्यातील आकेरी गावातील श्री. गणेश पुंडलिक पालव हे गुरुवारी (२ जुलै) गुरे चरायला घेऊन गेले होते. मात्र, शेतातील वहाळीला आलेल्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. आज, शुक्रवारी (३ जुलै) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३ जुलै रोजी सरासरी ३८.५ मिमी पावसाची नोंद झाली असून दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक १११ मिमी पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पाऊस नोंदीत झाला आहे: वैभववाडी ५१ मिमी, सावंतवाडी ५० मिमी, कणकवली ३८ मिमी, वेंगुर्ला ३५ मिमी, कुडाळ १६ मिमी, देवगड ०६ मिमी तर मालवण येथे ०१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे.
