सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ जुलैपासून सुरू झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक गावांना अंधाराचा सामना करावा लागला. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने पावले उचलल्यामुळे आता जिल्ह्यातील वीज पुरवठा वेगाने सुरळीत होत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः यासंदर्भातील माहिती दिली.
वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात उच्चदाब वाहिनीचे २८२ आणि लघुदाब वाहिनीचे ४१७ खांब कोसळले होते, तर २८ रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बंद पडले होते. या कठीण परिस्थितीत महावितरणने योग्य नियोजन करून आतापर्यंत उच्चदाब वाहिनीचे १९६ आणि लघुदाब वाहिनीचे ३१५ खांब पूर्ववत उभे केले आहेत. तसेच नादुरुस्त झालेले सर्व २८ रोहित्र दुरुस्त करून त्याद्वारे विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
अतिरिक्त ५०० खांब उपलब्ध:
९ जुलै रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिरिक्त ५०० वीज खांब उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित उच्चदाब वाहिनीचे ३६ आणि लघुदाब वाहिनीचे १०२ खांब उभे करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या नैसर्गिक आपत्तीत सर्वाधिक नुकसान दोडामार्ग तालुक्यात झाले असून तिथे महावितरणचे १० कंत्राटदार आणि सुमारे १०० कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्याखालोखाल सावंतवाडी येथे ७ कंत्राटदारांमार्फत ६६ कर्मचारी, कुडाळ येथे ५ कंत्राटदारांमार्फत ४५ कर्मचारी, तर वेंगुर्ला येथे ४ कंत्राटदारांमार्फत ४० कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करत आहेत.
दरम्यान, कणकवली, वैभववाडी, मालवण आणि देवगड तालुक्यातील सर्व गावांमध्ये वीज पुरवठा पूर्णपणे सुरळीत झाला असून, उर्वरित वाड्यांसाठी १२ कंत्राटदार नियुक्त केले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील केवळ १६ गावे आणि १२ वाड्यांचा वीज पुरवठा बंद असून, तोही तातडीने सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
वीज वितरण कंपनी हतबल…
सिंधुदुर्ग जिल्हा उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी अगोदरच चिंताग्रस्त होते. त्यातच अनेक ठिकाणी पाच,सहा,आठ दिवस वीज खंडित झाली होती. त्यामुळे आधुनिकतेची कास धरणाऱ्या प्रत्येकाला त्रास झाला. सध्या प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झाली आहे. त्यामुळे वीज नसल्याने डिजिटल यंत्रणा बंद झाली. आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी तर ओटीपी नसल्याने गॅस सिलिंडर मिळेनासे झाले त्याकडे प्रशासक सौ सावित्री पालेकर यांनी आवाज उठवला. पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय झाली.
