सावंतवाडी : ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेचा सण हा महिलांचा मानला जातो, जिथे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील पुरुष मंडळींनी गेली सोळा वर्षे या परंपरेला एक नवा आयाम दिला आहे. पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत त्यांनी वटपौर्णिमा साजरी केली आहे.

आजही वटपौर्णिमेच्या औचित्याने श्री गवळदेव मंदिरात उमेश गाळवणकर आणि त्यांच्या मित्रमंडळींनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी करत आपल्या पत्नीसाठी दीर्घायुष्याची कामना केली. या अनोख्या उपक्रमाची सुरुवात बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर आणि त्यांच्या मित्रमंडळींनी सुमारे १५ वर्षांपूर्वी केली होती. ‘स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची दोन चाके आहेत. जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची कामना करते, तर पुरुषांनी आपल्या पत्नीसाठी का करू नये?’ असा विचार करून त्यांनी हे व्रत सुरू केले.

या व्रताचे यंदाचे हे सोळावे वर्ष आहे. कुडाळ शहरातील श्री गवळदेव मंदिरात जमून या सर्व पुरुष मंडळींनी वडाची पूजा केली. श्री गवळदेवाला साकडे घालून उमेश गाळवणकर यांनी सर्वांच्या वतीने यथोचित वडाची पूजा केली. त्यानंतर सर्व पुरुष मंडळींनी वडाला फेऱ्या मारत दोरा गुंडाळला.

प्रा. अरुण मर्गज यांनी सांगितले की, “आपली पत्नी दरवर्षी आपल्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करते. मग आपण देखील तिच्यासाठी हे व्रत का करू नये असा विचार करून गेली १६ वर्ष आम्ही सर्व पुरुष मंडळी वटपौर्णिमा साजरी करत आहोत.” त्यांनी ही परंपरा बाकीच्यांनी सुद्धा सुरु करावी आणि आपल्या चांगल्या परंपरा जपाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी उमेश गाळवणकर आणि सौ. अमृता गाळवणकर यांनी एकत्र वडवृक्षाला फेऱ्या मारून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. या सोहळ्यात उमेश गाळवणकर, प्रा. अरुण मार्गज, राजू कलिंगण, प्रसाद कानडे, प्रा. परेश धावडे, सुनील गोसावी, ज्ञानेश्वर तेली, ओंकार कदम, महादेव परब, बळीराम जांभळे, अजय भाईप आणि सुरेश वरक हे सहभागी झाले होते. हा उपक्रम समाजात स्त्री-पुरुष समानतेचा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.