सावंतवाडी: ‘युनेस्को’सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने दखल घेतलेली अश्मयुगीन कातळशिल्पे हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अद्भुत आणि अभिमानास्पद वारसा आहे, अशी भावना सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कुडोपी येथे व्यक्त केली. जिल्ह्यातील कातळशिल्प ठिकाणाला भेट देणाऱ्या त्या पहिल्या जिल्हाधिकारी ठरल्या आहेत.
जिल्ह्यात कातळशिल्प संशोधनाचा पाया घातलेले अभ्यासक आणि निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत यांच्या विनंतीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कुडोपी येथील ‘बाहुल्यांचे टेंब’ या ठिकाणी भेट देऊन कातळशिल्पांची पाहणी केली. कडक उन्हाची पर्वा न करता सुमारे दोन तास त्या परिसरात थांबून त्यांनी तीन समूहांत विखुरलेली ८० हून अधिक कातळशिल्पे काळजीपूर्वक पाहिली व त्याचे बारकावे जाणून घेतले. यावेळी सतीश लळीत यांनी त्यांना या शिल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, मालवणचे तहसीलदार शेखर लव्हे आणि कवयित्री डॉ. सई लळीत सहभागी झाले होते.
पर्यटन आणि संरक्षणासाठी पावले उचलणार: जिल्हाधिकारी
पाहणीनंतर बोलताना जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, “ही कातळशिल्पे केवळ सिंधुदुर्गच्याच नव्हे, तर संपूर्ण कोकणच्या प्रागैतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. यातून कोकणची प्राचीन संस्कृती, अश्मयुगीन काळातील मानवी समूहांची वर्तनपद्धती यांचे दर्शन घडते. पर्यटनाच्या दृष्टीनेही हे स्थान महत्त्वाचे असून, ही कातळशिल्पे जपणे आणि तिथे आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासन नक्कीच पावले उचलेल.”
कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीचे स्वागत केले. “मी गेली २५ वर्षे या परिसराच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न करत आहे. आता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिल्याने येथील संरक्षण, रस्ते आणि प्राथमिक सुविधांच्या कामाला गती मिळेल. बुधवळे-कुडोपी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने लवकरच जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल. तसेच जिल्हा विकास मंडळाकडून निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे,” असे लळीत यांनी सांगितले.
याप्रसंगी बुधवळे-कुडोपीचे सरपंच संतोष पानवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आभार मानले. यावेळी पंचायत सदस्य प्रशांत पडवळ, ग्रामस्थ राजेंद्र हिर्लेकर, अशोक वाळवे, महेश पडवळ आदी उपस्थित होते.
