मुंबई : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनींवर परप्रांतीय भूमाफियांची वक्रदृष्टी पडली आहे. स्थानिकांच्या जमिनी हडप करण्यापासून हजारो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यापर्यंतचे गंभीर प्रकार घडत आहेत. दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावातील जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण गंभीर आहे. तत्कालीन तहसीलदारांनी बनावट कागदपत्रे तसेच सहहिसेदारांची परवानगी न घेता अकृषक व विकासाची परवानग्या परप्रांतियांना दिल्या आहेत, या बाबत सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

या बाबत पाटील यांनी महसूल मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, पावसाळी अधिवेशनात हा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आणला होता. त्यावर महसूल मंत्र्यांनी सर्व प्रकाराची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन सभागृहास दिले होते.

आता परप्रांतीय भूमाफियांची हिंमत एवढी वाढली आहे की, ते आता शासनाला देखील घाबरत नाहीत. याच जमिनीवरील ६,००० हून अधिक वृक्षांची विनापरवाना कत्तल करण्यात येत असून, डोंगराचे सपाटीकरण भूमाफियांकडून सुरू आहे. असाच प्रकार याच भागातील घारपी उडेली गावात घडत असून, तिथे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बांध घालून अडवण्याचा प्रकार परप्रांतीयांकडून चालू आहे. बेकायदा गौण खनिज उत्खनन करून विक्री करण्यात येत आहे. सरकारने या सर्व प्रकरणांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि सिंधुदुर्गची जमीन, नैसर्गिक जैवसंपदा, भूमाफियांपासून वाचवावी व स्थानिकांना न्याय द्यावा, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.