​सावंतवाडी: वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली-कोऱ्याचीवाडी येथे एका बागायतदाराच्या घरात बिबट्या शिरल्याची थरारक घटना बुधवारी सकाळी घडली. विवेक जोशी यांच्या स्वयंपाकघरात आश्रयाला आलेल्या या जखमी बिबट्याला वनविभागाने शिताफीने जेरबंद केले असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

​गोठ्यातून थेट स्वयंपाकघरात:

​गेल्या अनेक दिवसांपासून दाभोली परिसरात या बिबट्याचा वावर होता. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विवेक जोशी यांना हा बिबट्या त्यांच्या बागेत दिसला. काही वेळाने तो घराशेजारील गुरांच्या गोठ्यात येऊन बसला. ग्रामस्थांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला असता, घाबरलेला बिबट्या थेट जोशी यांच्या घराच्या स्वयंपाकघरात घुसला. बिबट्या अत्यंत जखमी आणि अशक्त असल्याने तो तिथेच एका कोपऱ्यात बसून राहिला.

​घटनेची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कुडाळ येथील जलद बचाव पथकाने विशेष काळजी घेत स्वयंपाकघरातून बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद केले. या कारवाईत वनपाल सावळा कांबळे, सूर्यकांत सावंत आणि इतर वनरक्षकांचा सहभाग होता.

​प्रकृती स्थिर, वैद्यकीय उपचार सुरू:

​हा बिबट्या सुमारे दोन वर्षांची मादी असून काटेरी कुंपणामुळे तिच्या मानेला गंभीर जखम झाली होती. जखम चिघळल्याने तिला प्रचंड अशक्तपणा आला होता. जेरबंद केल्यानंतर बिबट्याला तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. डॉ. शरद जाधव, डॉ. सागर चव्हाण आणि डॉ. राजश्री जाधव यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.

​”बिबट्या जखमी आणि घाबरलेल्या स्थितीत असल्याने त्याने कोणावरही हल्ला केला नाही. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून पुढील तीन दिवस तो वनविभागाच्या निरीक्षणाखाली असेल. पूर्णपणे बरा झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. नागरिकांना असा कोणताही जखमी वन्यप्राणी आढळल्यास त्यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा,” असे आवाहन कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी केले आहे.