सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या चौथ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेसाठी १ नगराध्यक्ष व ४ नगरसेवक, तर मालवण नगरपरिषदेसाठी ३ नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

सावंतवाडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून ठाकरे शिवसेनेच्या सौ सिमा मठकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी जनता दलातून ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांचे स्वागत केले.

​दरम्यान, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती जिल्ह्यात चर्चेत असतानाच, कणकवली नगरपंचायत व मालवण नगरपरिषदेत मात्र भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मालवणमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) संघर्ष:

​मालवण नगरपरिषदेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की, मालवणमध्ये भाजप १६ तर शिंदे शिवसेना ४ जागांवर लढेल. तसेच, त्यांनी “शिवसेना (शिंदे गट) मालवण शहरात शून्य आहे” असे वक्तव्य केले.

​शिंदे गटाचे प्रतिउत्तर: यावर शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी टोला लगावला आहे. “शुन्यातून विश्व निर्माण करण्याची शिवसेनेत धमक आहे. आम्हाला घमेंड नाही,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ​यामुळे मालवण नगरपरिषद आणि कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपने घेतलेली भूमिका शिवसेना (शिंदे गट) च्या “जखमेवर मीठ चोळणारी” ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सावंतवाडी नगराध्यक्ष पदावरून महायुतीची शक्यता मावळली आहे. ​बहुप्रतिक्षित सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सुरू असलेल्या रस्सीखेचमुळे महायुती होण्याची शक्यता मावळली आहे. दोन्ही गटांनी आपले उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत असल्याने, सावंतवाडीत महायुतीऐवजी ‘स्वबळावर किंवा मैत्रीपूर्ण’ लढत होण्याची चिन्हे आहेत.

​कणकवलीत वेगळे चित्र:

​दुसरीकडे, कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समिर नलावडे यांनी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे. विशेष म्हणजे, कणकवलीमध्ये भाजपने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले आहे.

ठाकरे गटाची नवी रणनीती:

​महायुतीत निर्माण झालेल्या या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने कणकवली येथे महा विकास आघाडी (मविआ) करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत शहर विकास आघाडीचा फाॅर्मुला महत्त्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.