तारकर्ली बोट अपघात : “…तरी त्या दोघांचे प्राण वाचले असते”; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

तारकर्ली येथील ‘जय गजानन’ बोट किनाऱ्यावर येत असताना बुडाल्याने मंगळवारी दोन पर्यटकांचा मृत्यू झाला.

Rane on Sindhudurg Malvan
ट्विटरवरुन निलेश राणेंनी नोंदवलं मत (प्रातिनिधिक फोटो)

तारकर्ली येथे पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून, त्यांच्यावर वेगवेगळय़ा रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेनंतर पर्यटकांना तारकर्ली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र आकाश भास्करराव देशमुख (३०, रा. शास्त्रीनगर, अकोला) आणि डॉ. स्वप्निल मारुती पिसे (४१, आळेफाटा, पुणे) या दोन पर्यटकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच दुर्घटनेवरुन आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर आणि खास करुन राज्याच्या पर्यटनमंत्र्यांवर म्हणजेच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधताना या दोन पर्यटकांचा जीव वाचू शकला असता असं म्हटलंय.

नक्की पाहा >> Photos: श्वासांसाठी धडपड, आरडाओरड अन् धावपळ…; तारकर्ली बोट दुर्घटनेनंतरचे धक्कादायक फोटो

नेमकं घडलं काय?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी सध्या उन्हाळी हंगामामुळे पर्यटकांची मोठी गर्दी आहे. मालवण, तारकर्ली, देवबाग आदी ठिकाणी मोठय़ा संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे समुद्रात नौकानयन व अन्य सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यापैकीच तारकर्ली येथील ‘जय गजानन’ बोट किनाऱ्यावर येत असताना बुडाल्याने हा अपघात घडला. बोट किनाऱ्याजवळ येत असताना लाटांच्या तडाख्यामुळे हा अपघात झाला. तसेच क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांमुळे लाटांच्या तडाख्याने ती एका बाजूला कलंडली, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

निलेश राणे यांचा निशाणा
निलेश राणे यांनी प्रत्यक्षपणे कोणाचाही उल्लेख न करता या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत पर्यटनस्थळ म्हणून मालवण, तारकर्लीचा विकास करताना येथे पुरेश्या आरोग्य सुविधा पुरवण्यात आलेल्या नसल्याची खंत व्यक्त केली. “मालवण, तारकर्ली, देवबाग ही नावं आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर असताना मालवण ग्रामीण रुग्णालयात एक व्हेंटिलेटर नाही. आज दोन पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर असते तरी दोघांचे प्राण वाचले असते. त्यापैकी एकाला खासगी रुग्णालयात हलवल्याने एकाचा जीव वाचला,” असं ट्विट निलेश राणेंनी केलंय.

निलेश राणेंच्या ट्विटवर अनेक रिप्लाय
निलेश राणेंच्या ट्विटवर अनेकांनी वेगवेगळे रिप्लाय दिले असून काहींनी तुम्हीच या भागातून खासदार होता अशी आठवण करुन दिलीय. “महाशय तेथील स्थानिक खासदार होते ना? शिवाय आपले पिताश्री २० वर्षे मालवणचे स्थानिक आमदार, मुख्यमंत्री, मंत्री होते. सध्या केंद्रीय मंत्री आहेत. त्यावेळी स्वतःच्या खासगी रुग्णालयाच्या प्रोजेक्ट पुढे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच मिळाला नाही राव,” असा टोला एकाने लगावलाय. तर अन्य एकाने अशाप्रकारच्या साहसी खेळांसाठी नियम कठोर हवेत असं म्हटलंय.

कारवाईची तयारी
‘जय गजानन’च्या नौकामालकांनी सुरक्षेची काळजी घेतली होती किंवा नाही, याची चौकशी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने सुरू केली आहे. सुट्टय़ांच्या काळात येथे काही ठिकाणी अनधिकृत बोटिंगही केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई केली जाईल, असेही संकेत बगाटे यांनी दिले.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sindhudurg malvan tourist boat sink nilesh rane slams health system scsg

Next Story
राज्य काँग्रेसमधील नवे मुस्लीम नेतृत्व; डॉ. वझाहत मिर्झा अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष
फोटो गॅलरी