​सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदार यंदाच्या हंगामात अस्मानी संकटामुळे पूर्णपणे कोलमडून गेला आहे. बदलत्या हवामानामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची दखल घेऊन आंबा-काजू शेती ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून जाहीर करावी, या मुख्य मागणीसाठी आज गुरुवार, दि. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘निर्धार मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

​हवामान बदलाचा ८० ते ९० टक्के फटका

​यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस, दाट धुके आणि दव यामुळे आंबा व काजू बागांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काजू व आंब्याचा मोहर जळून गेला असून, काही भागांत फळांवर काळे डाग पडल्याने ती निकामी झाली आहेत. काजू बागायतदारांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसला असून शेतकरी आता कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

​राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली एल्गार

​स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकताच देवगड, वेंगुर्ले आणि मालवण परिसरातील बागांची प्रत्यक्ष पाहणी केली. बागायतदारांची दयनीय अवस्था पाहता, सरकारने अर्थसंकल्पात – आंबा बागायतदारांना हेक्टरी ५ लाख रुपये, काजू बागायतदारांना हेक्टरी ३ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र संघर्षाचा पवित्रा घेत हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​बाजारपेठा राहणार बंद; लोकप्रतिनिधींचा पाठिंबा

​या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, हापूससाठी प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्यातील बागायतदारांनी आपली बाजारपेठ बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाला माजी आमदार वैभव नाईक, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, सावंतवाडी-दोडामार्ग बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, तसेच वेंगुर्ले येथील जयप्रकाश चमणकर, एम. के. गावडे, संजय गावडे यांसारख्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. जिल्ह्यातील सर्व आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता ओरोस छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बागायतदार संघाकडून करण्यात आले आहे.