सावंतवाडी: गेल्या दहा-बारा दिवसांच्या प्रदीर्घ खंडानंतर अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. रविवारी पासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी झालेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींमुळे कोरड्या पडू लागलेल्या धरणीमातेला दिलासा मिळाला असून, करपू लागलेल्या भात रोपांना नवसंजीवनी मिळाली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत सापडलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळेत भात पेरणीची कामे पूर्ण केली होती. मृग नक्षत्राच्या प्रारंभी चांगला पाऊस होईल, या अपेक्षेने अनेकांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता कमालीची वाढली होती. मृग नक्षत्र सुरू होऊन तब्बल पंधरा दिवस उलटून गेले तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने भाताची रोपे करपू लागली होती. अनेक ठिकाणी रोपांचा हिरवा रंग फिका पडून ती पिवळी दिसू लागली होती. पावसाअभावी शेतजमिनींमध्ये ओलावा कमी झाल्याने भात रोपांच्या वाढीवर गंभीर परिणाम होऊ लागला होता. काही शेतकऱ्यांनी विहिरी, ओढे किंवा उपलब्ध जलस्रोतांमधून पाणी आणून भाताच्या तरव्यांना शिंपण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र सर्वच शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांच्या रोपांवर संकटाचे ढग दाटून आले होते. पाऊस आणखी काही दिवस लांबला असता तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
सध्या जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसाचे पोषक चित्र तयार झाले आहे. अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने शेतजमिनींना आवश्यक ओलावा मिळाला आहे. या पावसामुळे भात रोपांना पुन्हा जीवदान मिळाले असून, आगामी काही दिवस नियमित पाऊस झाल्यास भात लागवडीची कामेही वेग घेणार आहेत. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णता आणि दमट हवामानामुळे नागरिकही कमालीचे त्रस्त झाले होते. रविवारी पासून झालेल्या पावसामुळे वातावरणात किंचित गारवा निर्माण झाला असून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहून समाधानकारक पाऊस पडावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी नोंद झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी (मिमी मध्ये) पुढीलप्रमाणे आहे: देवगड १२६, कुडाळ १०३, वैभववाडी ९७, कणकवली ९०, सावंतवाडी ८७, दोडामार्ग ८०, मालवण ३४ आणि वेंगुर्ला ३० मिमी. जिल्ह्यात आज एकूण ८०.८७ मिमी इतक्या सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
