सावंतवाडी: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आडाळी औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश जागा गोल्फ प्रोजेक्ट कंपनीला देण्याची घोषणा केल्यानंतर स्थानिक औद्योगिक क्षेत्र विकास कृती समिती चांगलीच आक्रमक झाली आहे. “आम्ही जमिनी उद्योगांसाठी दिल्या आहेत, रिसॉर्ट किंवा गोल्फ कोर्स उभारून स्थानिकांना फक्त वॉचमन आणि ड्रायव्हरचाच रोजगार मिळावा ही मानसिकता आम्ही खपवून घेणार नाही,” असा सज्जड इशारा आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीचे अध्यक्ष तथा सरपंच पराग गांवकर आणि सचिव प्रवीण गांवकर यांनी दिला आहे.
आडाळीत उद्योग उभारणीसाठी इच्छुक असलेल्या किती उद्योजकांनी कोणत्या अटी-शर्थी ठेवल्या?गोल्फ प्रोजेक्ट कंपनीने अशा कोणत्या अटींची पूर्तता करण्याची तयारी दर्शवली? हे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट करावे असे त्यांनी आवाहन केले आहे. श्री. गांवकर म्हणाले की, आडाळीतील भूखंड एका रिअल इस्टेट कंपनीच्या घशात घालण्याचा डाव आहे. यासाठीच ऑनलाईन भूखंड मागणी प्रक्रिया रद्द केली आणि भूखंड घेतलेल्या ५० हून अधिक उद्योजकांच्या परवानगी प्रक्रिया ‘होल्ड’वर ठेवल्या.
उद्योगमंत्री सामंत यांनी गोल्फ प्रकल्पाला जागा देण्यासाठी ‘उद्योजक अटी-शर्थी ठेवत आहेत’ हे दिलेले कारण हास्यास्पद असल्याचे समितीने म्हटले आहे. “मुळात असे किती उद्योजक सामंत यांना तीन वर्षांत भेटले, हे जाहीर करावे,” असे आव्हान कृती समितीने दिले आहे. गेल्या तीन वर्षांत शेकडो उद्योजक आडाळीत येण्यास तयार असताना, महामंडळ प्रशासन आणि मंत्र्यांच्या अटी-शर्थींमुळे ते बेजार झाले आहेत, असे समितीचे म्हणणे आहे.
आडाळीत उद्योग आणण्याची धमक नसेल, तर आलेल्या उद्योजकांना परवानग्या द्या, असे आवाहन करतानाच समितीने सामंत यांना थेट आव्हान दिले आहे. “स्वतः उद्योगमंत्री सामंत यांनी आडाळीत यावे. आम्ही त्यांच्यासमोर ग्रीन कॅटेगरीमधील १०० उद्योजकांची ‘परेड’ घडवून आणण्यास तयार आहोत. त्यासाठी उद्योजकांच्या कोणत्याही अटी नसतील, मात्र तुम्हाला तुमच्या अटी बाजूला ठेवाव्या लागतील. दोन महिन्यांत विशेष विंडो ओपन करून परवानग्या द्या, आम्ही दोन महिन्यांत १०० उद्योजक आणतो,” असे सरपंच पराग गांवकर यांनी ठणकावले.
सध्या किमान ८०० जणांना रोजगार देणारे उद्योग येथे आले आहेत, मात्र परवानगीअभावी कोट्यवधी रुपये गुंतवलेले उद्योजक अडचणीत आहेत. एका गोल्फ कोर्सऐवजी शेकडो लहान उद्योग आले, तर हजारो रोजगार येतील, असे मत समितीने व्यक्त केले आहे. औद्योगिक विकासाला पोषक वातावरण बिघडणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
