सावंतवाडी: सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का अशी आर्त हाक शेतकरी देत असतानाच उष्णता जाणवत असल्याने शाळांचे वेळापत्रक बदलण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून शाळांचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात जाहीर करण्यात आले आहे.
पावसाचा हंगाम सुरू झाला असला तरी पाऊस गायब असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्णतेचा कडाका वाढला आहे.
या तीव्र उष्णतेचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याची गंभीर दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या आदेशानुसार, जिल्ह्यातील शाळा १९ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत भरतील.
दुपारच्या वेळात वर्गातील कडक उष्णता आणि येण्या-जाताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या निर्देशानुसार, माध्यमिक शिक्षणाधिकारी किंजवडेकर यांनी याबाबतचे लेखी आदेश जारी केले आहेत. या निर्णयासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
शाळांच्या वेळेत बदल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना तीव्र उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला असून, या निर्णयाचे पालक आणि शिक्षक वर्गातून स्वागत केले जात आहे. १ जुलैपासून शाळांचे वेळापत्रक पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भागात विखुरलेल्या स्वरूपात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून पायपीट करून शाळेत यावे लागते त्यामुळे उष्णतेचे चटके विद्यार्थ्यांना बसत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
