सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी पर्यटनाला जागतिक नकाशावर नेणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला आहे. मालवण-वेंगुर्ला जवळील निवती रॉक समुद्रात भारताचे पहिले अंडरवॉटर म्युझियम (समुद्राखालील संग्रहालय) आणि आर्टिफिशियल रीफ (कृत्रिम समुद्री प्रवाळ) प्रकल्पासाठी भारतीय नौदलाची सेवामुक्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ (EX INS Guldar) समुद्रतळाशी यशस्वीपणे विसर्जित करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून विजयदुर्ग येथे विसर्जनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या युद्धनौकेची अखेर निवती समुद्रात समुद्रतळापासून सुमारे २२ मीटर खोलीवर सुरक्षितपणे स्थापना करण्यात आली असून, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोकण विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. ते म्हणाले की, “गेले अनेक दिवस आमची टीम यासाठी प्रयत्नशील होती. समुद्रातील खवळलेले वातावरण आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अखेर ही युद्धनौका दक्षिण दिशेकडे, म्हणजेच गोव्याच्या दिशेने तोंड करून समुद्रतळाशी सुरक्षितपणे स्थापित करण्यात आली आहे.”
सागरी जीवसृष्टी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढणार:
८१ मीटर लांब, २२ मीटर उंच आणि १,२०० टन विस्थापन असणारी ‘गुलदार’ ही युद्धनौका मूळची पोलंड देशाची निर्मिती आहे. १९८५ मध्ये ती भारतीय नौदलात सामील झाली होती. श्रीलंका तसेच अंदमान-निकोबार बेटांवर जवळपास चार दशके शौर्याने देशसेवा केल्यानंतर ती सेवानिवृत्त झाली. आता ही नौका पर्यटनाच्या नव्या सेवेत दाखल झाली आहे.
समुद्रतळाशी बुडालेल्या या युद्धनौकेचे प्रवाळ बेटांत रूपांतर होऊन त्यावर सागरी जीवसृष्टीचा नैसर्गिक अधिवास तयार होण्यासाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या प्रकल्पासाठी गोवा येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेमार्फत सखोल वैज्ञानिक अभ्यास करण्यात आला असून, जहाजातील सर्व घातक व प्रदूषणकारक घटक पूर्णपणे हटवून ते पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित करण्यात आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून जहाजाच्या ५०० मीटर परिसरात मासेमारी आणि अँकर टाकण्यास बंदी प्रस्तावित करण्यात आली आहे.
दीड वर्षात पर्यटकांसाठी खुली होणार; पाणबुडी सफारीचे आकर्षण
दीपक माने यांनी स्पष्ट केले की, ही युद्धनौका पर्यटकांना पाहण्यासाठी आगामी एक ते दीड वर्षात खुली केली जाईल. यासाठी विशेष पाणबुडी निर्मितीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. प्रस्तावित पाणबुडी सफारीद्वारे पर्यटकांना समुद्राखाली जाऊन ही युद्धनौका पाहता येईल. याशिवाय, तांत्रिक बाबींचा अभ्यास करून स्कुबा डायव्हिंगद्वारेही ती पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिली जाईल.
स्थानिक रोजगाराला मिळणार मोठी चालना:
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आता आंतरराष्ट्रीय स्तरावर “अंडरवॉटर टुरिझम डेस्टिनेशन” म्हणून होणार असून देश-विदेशातील पर्यटक येथे आकर्षित होतील. पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग, अंडरवॉटर एक्सप्लोरेशन, पाणबुडी पर्यटन, समुद्राखालील फोटोग्राफी आणि सागरी जैवविविधतेचा अनोखा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण, पर्यटन मार्गदर्शक, बोट सेवा, हॉटेल व्यवसाय आणि इतर पूरक उद्योगांना मोठी चालना मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. एकूणच जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी बळकटी मिळणार आहे.
(व्हिडिओ समुद्राच्या तळाशी स्थापित करताना)
