सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा आणि जिल्ह्याला खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरेल असाच ‘शक्तीपीठ’ महामार्ग तयार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच ओसरगाव टोल नाका सुरू झाला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘MH-07’ पासिंगच्या वाहनांना कोणताही टोल लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​शक्तीपीठ महामार्गाबाबत पालकमंत्री म्हणाले की, या महामार्गाचा आराखडा नव्याने तयार करण्यात आला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि विशेषतः रेडी बंदराला मोठा फायदा होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेऊन प्रशासकीय बैठका पार पडल्या आहेत.

​महत्त्वाची बाब म्हणजे, बांदा व परिसरातील गावे या प्रकल्पामुळे बाधित होणार नाहीत, अशा पद्धतीने मार्ग काढण्यात आला आहे. हा मार्ग रेडी पोर्टला जोडला जाणार असून, कोणत्याही संघर्ष समितीच्या पत्रावर नव्हे तर जनहिताचा विचार करून सरकार निर्णय घेत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

​कणकवली येथील ओसरगाव टोल नाका सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, “मी आमदार असतानाही जिल्हावासीयांवर टोल लागू दिला नव्हता. आता मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे ओसरगाव टोल नाका सुरू झाला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘MH-07’ क्रमांकाच्या कोणत्याही वाहनाला टोल भरावा लागणार नाही.”

​यावेळी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोंसले, लखम सावंत भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जि.प. सदस्य विक्रांत सावंत, जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.